पत्रकार संघात सुहास फडकेंची स्मरणसभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सुहास फडके,ज्येष्ठ पत्रकार

सामना ऑनलाईन । मुंबई

‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी वरिष्ठ सहाय्यक संपादक सुहास फडके यांचे 9 ऑक्टोबर 2018 रोजी निधन झाले. मनमिळावू व दिलखुलास स्वभाव यामुळे सुहास फडके यांचा पत्रकारिता आणि बाहेरच्या क्षेत्रात मोठा मित्रपरिवार होता. राजकारण, अर्थकारण व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते जाणकार होते. सुहास फडके हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य होते. 1983-84 या वर्षात ते पत्रकार संघाचे कार्यवाह होते. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघात उद्या, मंगळवार दि. 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता सुहास फडके यांच्या स्मरणसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे हे या सभेच्या अध्यक्षस्थानी असतील.

फडके यांचे समकालीन पत्रकार, मित्र त्यांच्या आठवणी सांगतील. सुहास फडके यांनी रुईया कॉलेजातून ‘बीए’ची पदवी घेतल्यानंतर ते ‘ब्लिट्झ’ साप्ताहिकात दाखल झाले. तिथे काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर मुंबई दूरदर्शन, आकाशवाणी व ‘इंडिपेंडंट’मध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले. ‘बॉम्बे टाइम्स’मध्ये सिटी एडिटर व विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. तब्बल 12 वर्षे त्यांनी इंग्रजी वृत्तपत्रांत काम केले. त्यानंतर दीर्घकाळ ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये कार्यरत होते. ‘मटा’मध्ये त्यांनी क्रीडा पत्रकार, मुख्य वार्ताहर म्हणून काम पाहिले. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीतही त्यांनी काम केले. सन 2008 ते 2012 या दरम्यान त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’च्या संपादकपदाची धुरा वाहिली होती.

पत्रकारितेबरोबरच राजकारण व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी माणसे जोडली होती. पदावर नसतानाही त्यांचे हे संबंध अखेरपर्यंत टिकून होते. निवृत्तीनंतरही त्यांच्यातील पत्रकार कधी स्वस्थ बसला नाही. अनुवाद, ब्लॉग व स्तंभलेखनाचे त्यांचे काम अखंड सुरू होते.