मेट्रोने दोन दिवसांत सवा लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला, प्रवासी वाढल्यास फेऱ्याही वाढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी (पश्चिम)- दहिसर-गुंदवली दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोच्या गारेगार प्रवासाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसांत तब्बल सव्वा लाख प्रवाशांचा टप्पा ओलंडला आहे. सर्वसमान्य प्रवाशांसाठी मेट्रो शुक्रवारी दुपारी सुरू झाली. त्यानुसार पहिल्या दिवशी तब्बल 84 हजार 900 प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला होता, तर आज सुमारे 40 हजार प्रवाशांनी मेट्रो सेवेचा लाभ घेतला आहे.

मेट्रो 2 अ आणि 7 या मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांना चांगली कनेक्टीवीटी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या मेट्रोने दररोज सुमारे 30 हजार प्रवासी प्रवास करत होते. मात्र आता त्यामध्ये वाढ होऊन एकूण प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पहिल्या दिवशी प्रवास केलेल्या 84 हजार प्रवाशांपैकी 48 हजार 813 प्रवाशांनी मेट्रोच्या 2 अ मार्गावर तर 36 हजार 616 प्रवाशांनी मेट्रो 7 या मार्गावर प्रवास केला आहे. सध्या अंधेरी-दहिसर-गुंदवली या मार्गावर दररोज 236 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मात्र प्रवाशांची संख्या जशी वाढेल त्या प्रमाणात गाडय़ा वाढवल्या जातील असे एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सांगितले. तसेच गर्दीच्या वेळी सकाळी साडेआठ ते साडेदहा आणि सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत जादा गाडय़ा चालवल्या जातील असेही त्यांनी सांगितले.