
मुंबईकरांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास घडविणाऱ्या मेट्रो लाइन-7 (दहिसर पूर्व ते आरे मिल्क कॉलनी) आणि मेट्रो लाइन-2 (अ) (दहिसर ते डहाणूकरवाडी) या दोन मेट्रो मार्गांच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गोरेगाव पूर्व येथे एका सोहळय़ात करण्यात येणार आहे. या दोन मार्गांमुळे दहिसर ‘ईस्ट ते वेस्ट’ कनेक्टिव्हिटी मिळणार असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे. या मेट्रो मार्गांचा दुसरा टप्पा ऑगस्टपर्यंत सुरू करण्याची एमएमआरडीएची योजना असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.
मेट्रोच्या रोज 150 फेऱ्या
मेट्रोचे कोच बंगळुरूच्या बीईएमएल कंपनीचे असून प्रत्येक मेट्रोला सहा डबे आहेत. सध्या अशा 11 मेट्रो ताफ्यात असून डहाणूकरवाडीहून सकाळी 6 वाजता पहिली ट्रेन सुटेल तर शेवटची ट्रेन रात्री 10 वाजता सुटेल. मेट्रोच्या दोन एलिव्हेटेड मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर रात्री आठ वाजल्यापासून मुंबईकरांसाठी मेट्रोची सेवा सुरू केली जाणार आहे.
मेट्रो-7 वरील स्थानके
मेट्रो मार्ग-7 दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) असा आहे. आरे कॉलनी ते डहाणूकरवाडी हा सुमारे 20 कि.मी.चा पहिला टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे. मेट्रो-7 मार्गावर दहिसर (पूर्व), ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे, गोरेगाव (पूर्व), महानंद डेअरी, जोगेश्वरी (पूर्व), जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी-पूर्व) स्थानकांचा समावेश आहे.
मेट्रो-2 (अ) वरील स्थानके
मेट्रो मार्ग-2 (अ) दहिसर ते डी. एन. नगर असा एकूण 18.6 किलोमीटरचा आहे. या मार्गावर दहिसर (पूर्व), आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एक्सर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), डहाणूकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डी. एन. नगर अशी स्थानके आहेत.
































































