मेट्रोचे सीप्झपर्यंतचे भुयार पूर्ण, पॅकेज-7 मधील 100 टक्के काम फत्ते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो-3 प्रकल्पाच्या कामातील आणखी एक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. मेट्रोसाठी भुयार खोदणाऱया टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) सीप्झ आणि सारीपूत नगरपर्यंतचे भुयारीकरण पूर्ण केले.

वैनगंगा-2 या टीबीएमने पाली मैदान ते सीप्झपर्यंतचे 1.67 किलोमीटरचे अंतर पार करत भुयारीकरणाचा 24वा टप्पा गाठला. या भुयारीकरणासाठी 1196 रिंग्ज वापरल्या गेल्या. भुयार करतानाच टीबीएम मशीनद्वारे भुयाराच्या भिंतीवर या रिंग्जद्वारे वर्तुळ करत पुढे सरकतात. या भुयारीकरणाने मरोळ नाका, एमआयडीसी आणि सीप्झपर्यंतचा भुयारी मार्ग तयार झाला आहे.

सीप्झपर्यंतच्या भुयारासोबतच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-2 ते सारीपूत नगरपर्यंतचे 7.07 किलोमीटर भुयारीकरणही पूर्ण झाले. याबरोबरच मेट्रो-3 प्रकल्पाच्या भुयारीकरणाच्या पॅकेज-7 मधील भुयारीकरण 100 टक्के पूर्ण झाले असून संपूर्ण भुयारीकरण पूर्ण होणारे पॅकेज-7 हे पहिले पॅकेज ठरले आहे. मुंबई मेट्रो रेल महामंडळाने (एमएमआरसी) ही माहिती ट्विटरवरून दिली.

– गेल्याच महिन्यात एमएमआरसीने मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाच्या एकूण भुयारीकरणापैकी 70 टक्के भुयारीकरण पूर्ण केले. 24 महिन्यांत हे काम पूर्ण झाले. मेट्रो-3 प्रकल्प 33.5 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर 27 स्थानके असून त्यातील 26 स्थानके ही भुयारी असणार आहेत.