
एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अनबलगन यांच्या फोटोचा गैरवापर करून व्हॉट्सऍपवर बनावट अकाउंट तयार केल्याची माहिती समोर आली आहे. सायबर ठगाने अनबलगन यांच्या नावाने एमआयडीसीच्या 77 कर्मचाऱ्यांना ईमेलदेखील पाठवले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दोन दिवसांपूर्वी महामंडळातील 77 कर्मचाऱयांना अनबलगन यांच्या नावाने एक मेल आला. या मेलनंतर कर्मचाऱयांनी अनबलगन यांना फोन करून विचारणा केली. तेव्हा तो ईमेल आपण पाठवला नसल्याचे त्यांनी कर्मचाऱयांना सांगितले.
या घटनेनंतर महामंडळातील आयटीचे अधिकारी यांनी अधिक तपासासाठी त्या ईमेलला उत्तर देत एक नंबर पाठवला. त्यानंतर त्या नंबरवरून आयटी अधिकाऱयाला एक मेसेज आला. त्या नंबरच्या प्रोफाइलवर अनबलगन यांचा फोटो होता. ठगाने आयटी अधिकाऱयाला तात्काळ अमेझॉन पे गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास सांगितले. तेव्हा हा प्रकार समोर आला. सायबर ठगाने अनबलगन यांचा फोटो वापरून व्हॉटस्ऍपवर बनावट अकाउंट तयार केले. याप्रकरणी विधी अधिकाऱयाने एमआयडीसी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.





























































