खरेदीची दिवाळी! मध्यमवर्गीयांची पसंती स्ट्रीट शॉपिंगला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

दिवाळीचा आनंद कमी करण्याची हिंमत महागाईत नाही. मुंबईकरांमध्ये तर खरेदीचा उत्साह दांडगा होता. महागाई असली तरी दिवाळीचे ‘बजेट’ प्रत्येकाने बाजूला ठेवले होते. दादर, क्रॉफर्ड मार्केटसह मुंबईतील बाजारपेठा हाऊसफुल्ल झाल्या होत्या. पाय ठेवायलाही जागा नाही इतकी झुंबड उडाली होती. महागाईला आव्हान देत सर्वांनी दिवाळीची खरेदी केली. बजेट शॉपिंगसाठी मॉल्स आणि दुकानांपेक्षा स्ट्रीट शॉपिंगला मुंबईकरांची पसंती होती.

दिवाळीचा बोनस झाल्याने आज सणापूर्वीच्या रविवारचा मुहूर्त साधत मुंबईकर आपल्या कुटुंबीयांसह खरेदीसाठी बाहेर पडले होते. दादरसह लालबाग, क्रॉफर्ड मार्केट, बोरिवली, मालाड, वांद्रे लिंकिंग रोड येथील बाजारपेठांमध्ये हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. कपडे, दागिने, फराळ, रांगोळी, कंदील, शोभेच्या वस्तू यांच्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्मार्टफोन, होम अप्लायन्सला ग्राहकांची मागणी होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकाने आणि मॉल्समध्ये विशेष ऑफर्स देण्यात आल्या होत्या.

मुंबईच्या मध्यभागी असलेल्या दादर मार्केटमध्ये तुडुंब गर्दी होती. सेनापती बापट मार्ग, छबिलदास रोड, डिसिल्व्हा रोड, फूल मार्केट परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. हिंदमाता परिसरातही हीच अवस्था होती. गर्दीमुळे काही मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. गर्दीमुळे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी 15 मिनिटे लागत होती. मध्यमवर्गीयांनी यंदा स्ट्रीट शॉपिंगला अधिक पसंती दिल्याचे चित्र होते.

झेंडूच्या दरात दुपटीने वाढ
दसऱ्यानंतर 20 ते 30 रुपये किलो असलेल्या झेंडूच्या फुलांचा दर आज 60 ते 80 रुपये किलोवर पोहोचला. अवकाळी पावसामुळे झेंडूच्या शेतीचे झालेले नुकसान त्यातच फुलांची वाढती मागणी यामुळे झेंडूच्या दरात वाढ झाल्याचे दादरमधील फूल विक्रेत्यांनी सांगितले. लक्ष्मीपूजनापर्यंत हे दर चढेच असतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

लोकल तुडुंब, वाहतुकीचाही खेळखंडोबा
आज खरेदीसाठी निघालेल्या मुंबईकरांचे मेगाब्लॉकने हाल झाले. लोकलमध्ये तुडुंब गर्दी होती. सकाळपासूनच मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गर्दीने गच्च होत्या. काही जण शॉपिंगसाठी स्वतःची वाहने घेऊन घराबाहेर पडल्याने रस्त्यावरही ट्रॅफिक जॅम झाले होते. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. शॉपिंगचा अर्धा दिवस प्रवासादरम्यानच वाया गेल्याच्या प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिल्या.

फटाक्यांचा फटका
रात्री 8 ते 10पर्यंतच फटाके वाजवायचे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्याने खरेच अडचण झाली आहे. तशात नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी तर आदेशाचे उल्लंघन केल्यास जेलमध्येच पाठवू, असा दम भरला आहे. मुंबई-ठाण्यातील पोलीस अधिकाऱयांनी मात्र खटले भरू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे फटाक्यांचा फटका कसा आणि कोणाला बसणार हे आता पाहावे लागेल.

दिवसातील 22 तास म्हणजेच रात्री 10पासून दुसऱया दिवशी रात्री 8पर्यंत फटाके वाजवले तर आठ दिवस जेलमध्ये, शिवाय 1200 रुपयांचा दंडही आकारला जाईल, अशी अधिसूचना पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी जारी केल्याने नाशिककरांची गोची झाली आहे. अर्थात हे फक्त नाशिकमध्येच, कारण मुंबई-पुण्यात मात्र पोलिसांनी असे काही आदेश काढलेले नाहीत. ठरवून दिलेल्या वेळेशिवाय फटाके वाजवले तर खटला दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

summary- middle class people like street shopping for diwali