मालाड आणि गोरेगावातून 150 लिटर भेसळयुक्त दूध जप्त

झटपट पैशासाठी दुधात घाणेरडे पाणी टाकून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या तिघांच्या क्राइम ब्रँच युनिट-11 ने मुसक्या आवळल्या. कृष्ण्या व्यंकय्या लिंगम्मा, येदाया नरसय्या भंडारी आणि व्यंकना गुंडगोनी अशी त्या तिघांची नावे असून तिघांकडून पोलिसांनी 150 लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे. त्या तिघांना पुढील कारवाईसाठी मालाड आणि गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

मालाड आणि गोरेगाव परिसरात काही जण दुधात भेसळ करून नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याची माहिती युनिट-11 ला मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या पथकातील सहायक निरीक्षक भारत घोणे, जाधव, काळे, भांबीड, केणी,  शिंदे, कानगुडे, कांबळे, रिया अणेराव यांच्या पथकाने तपास सुरू केला. आज सकाळी क्राइम ब्रँचच्या पथकाने गोरेगावच्या प्रेमनगर येथील घरात छापा टाकून कृष्ण्या आणि येदायाला दुधात भेसळ करताना रंगेहाथ पकडले. तेथून 130 अर्धा लिटर दूध, 69 दुधाच्या रिकाम्या पिशव्या आणि 2 हजार 990 रुपये जप्त केले. कृष्ण्या आणि येदाया हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून पहाटेच्या वेळेस दुधात भेसळ करत होते. दूध भेसळप्रकरणी त्या दोघांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना पुढील कारवाईसाठी गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई सुरू असतानाच युनिट-11 च्या पथकाने मालाड सुंदरनगरच्या लेबर क@म्पमधील एका घरात छापा टाकला. तेथे व्यंकना हा अमूल आणि गोकुळ दुधात भेसळ करताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दुधाच्या पिशव्यांत घाणेरडे पाणी टाकून ते भेसळयुक्त दूध विक्री करायचा. व्यंकनाकडून 95 लिटर दूध आणि 4 हजार 3555 रुपये जप्त केले. व्यंकनाविरोधात मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी दूध भेसळ केल्याप्रकरणी बांगूरनगर पोलीस ठाण्यात व्यंकनाविरोधात गुन्हा दाखल आहे.

आपली प्रतिक्रिया द्या