आदिवासी विभागाच्या दूध खरेदी टेंडरमधील गोलमालाची होणार चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

आश्रमशाळांमधील मुलांकरिता टेट्रा पॅकिंगमधील दुधाची खरेदी करण्यासाठी आदिवासी विभागाने मागवलेल्या ऑनलाइन टेंडरमध्ये गोलमाल झाल्याचे वृत्त नुकतेच दैनिक ‘सामना’मध्ये प्रकाशित झाले होते. त्याची आदिवासी विभागाने गंभीर दखल घेतली असून ऑनलाइन टेंडर प्रक्रियेची तांत्रिकदृष्टय़ा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे टेंडर प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यातील 502 आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहारांतर्गत दूध देण्यासाठी दररोज 45 हजार लिटर दुधाच्या खरेदीसाठी आदिवासी विभाग नाशिक यांनी ऑनलाइन टेंडर मागवले होते. त्यामध्ये टेंडरमधील तांत्रिक आणि व्यापारी निविदा 28 तारखेला सायंकाळी बंद करणे बंधनकारक असताना तो दोन दिवस उशिरा बंद केला गेला आहे. त्याचा फायदा घेत महानंदने भरलेला दुधाचा दर फुटला असून त्याआधारेच इतर दूध संघानी कमी दराच्या निविदा भरल्याचा आरोप महानंद डेअरीने केला आहे. महानंदचे दर इतर संस्थांनी पाहून कमी दर भरल्याने डेअरीला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे डेअरीने टेंडर प्रक्रियेत गोलमाल करणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.