
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईकर दुधासाठी आज भल्यापहाटेच हातघाईवर आले. शेतकऱयांनी मुंबईचा दूध पुरवठा रोखल्यानंतरही दूध डेअऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले दूध दोन दिवस मुंबईकरांपर्यंत पोहचवले. मात्र आता डेअऱ्यांकडील स्टॉक खालावला असून मागणी पूर्ण करण्यासाठी तब्बल आठ लाख लिटर दुधाचा तुटवडा आहे. दैनंदिन दुधाच्या तुलनेत २० टक्के कमी दुधाचा पुरवठा होणार असल्याने उशिरा दुधाच्या स्टॉलवर जाणाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे.
मुंबईत दरारोज महानंद, अमूल, गोकूळ, वारणा, प्रभात, आरे, मदर, गोवर्धन या प्रमुख डेअऱया सुमारे ४० लाख लिटर दुधाचा पुरवठा करतात, तर मुंबई परिसरात असलेल्या तबेल्यातून जवळपास दहा लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. मात्र शेतकरी अंदोलनामुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील दुधाचे संकलन झालेले नाही. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच दुधाचे टँकर मुंबईत आले आहेत, तर अमूल डेअरीलाही गुजरातमधून पुरेसे दूध आणता आले नाही. याचा फटका उद्याच्या दूध वितरणला बसणार आहे. ४० लाख लिटर दुधाची गरज असतानाही डेअऱ्यांकडे ३०-३२ लाख लिटर एवढेच दूध उपलब्ध आहे.
दोन दिवस मुंबईकरांना कसेबसे दूध मिळाले, मात्र उद्या २०-२५ टक्के दुधाचा तुटवडा जाणवणार आहे. रज्यातील हीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील तीन-चार दिवसांत वितरणासाठी मुंबईत दूध शिल्लक राहणार नाही. – श्री नाईक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दूध वितरक संघटना
राज्याबाहेरून दूध आणणाऱ्या डेअऱ्यांची चलती
शेतकरी आंदोलनामुळे राज्यातील दुधाचे संकलन बंद पडल्याने मुंबईपर्यंत दूध आणणे दूध संघांना कठीण झाले आहे. मात्र अमूल आणि मदर गुजरातमधून तर नंदिनी डेअरीला कर्नाटकमधून नेहमी दूध येते. त्या राज्यांमध्ये आजही सुरळीतपणे दुधाचे संकलन होत असल्याने रात्री टँकरने हे दूध मुंबईपर्यंत आणले जात आहे. त्यामुळेच अमूलकडे आज १२ लाख लिटर दूध उपलब्ध होते, तर मदर डेअरीकडे जवळपास साडेतीन लाख लिटर दुधाचा स्टॉक होता. तसेच नंदीनी डेअरीकडेही पुरेसे दूध आहे.
डेअरी – दुधाचा तुटवडा
गोकूळ – ४ लाख लिटर
अमूल – ३ लाख २५ हजार लिटर
गोवर्धन – ४० हजर लिटर
वारणा – ३० हजार लिटर
प्रभात – २० हजार लिटर



























































