आढावा बैठकीत वीज महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याला पालकमंत्र्यांनी झापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

विद्युत रोहित्राच्या दुरुस्ती व ऑईलसाठी जिल्हा नियोजन समितीकडे 5 कोटीची मागणी केली हे ठिक आहे, मात्र यापुर्वी दिलेल्या दोन कोटीचे काय केले? असा सवाल हिंगोलीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी वीज महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांना केला. त्यावर समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे तुमच्या उत्तरावर मी समाधानी नाही, शेतकरी हा शासनाच्या प्राधान्याचा विषय आहे, तुम्हीही प्राधान्यक्रमात पहिल्या स्थानी शेतकऱ्याला ठेवा, सरकार पैसे देत नाही, अशी शासनाची बदनामी करु नका, अशा शब्दात पालकमंत्री सावे यांनी भर आढावा बैठकीत अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांची खरडपट्टी काढली. लोकप्रतिनिधी व प्रशासन हे दोन दुवे असुन शासन त्या माध्यमातुन चालते. यासाठी परस्पर समन्वय ठेऊन विकासाचा गाडा पुढे घेऊन जाऊ असे आवाहन करतांनाच विचारलेली माहिती पुर्ण द्यावी व माहिती दडविण्याचा प्रयत्न करु नका, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांची हिंगोलीचे पालकमंत्री म्हणुन नियुक्ती झाल्यावर सोमवारी ते पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीडीसी सभागृहात पालकमंत्री सावे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ह.पी. तुम्मोड, आमदार तानाजी मुटकुळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्ह्याचा एकुण आढावा व भौगोलिक माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी अवगत करुन दिली. त्यानंतर कृषी, सहकार, रोहयो, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महावितरण, आरोग्य अशा विविध विभागांचा आढावा संबंधीत अधिकाऱ्यांनी दिला. शेतकरी कर्जमाफीची यादी बँका व गाव पातळीवर प्रसिध्द करण्याचे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. तसेच जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे मागणीनुसार टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा अशी सुचनाही त्यांनी केली. या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री सावे यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीची माहिती दिली.