
तमिळनाडूत एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. लैंगिक छळाला कंटाळून आपण आत्महत्या केल्याचे पीडित मुलीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
तमिळनाडूमध्ये 12 वीत शिकणार्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. दोन वर्षापूर्वी मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते. मुलगी आपल्या आई, आजी आणि एका चुलत भावंडासोबत राहत होती. परंतु कोरोनामुळे आजीचे निधन झाल्याने मुलगी खूपच दुःखी होती.
मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा तिची आई बाहेर गेली होती. खूप वेळा झाला मुलगी बाहेर आली नाही म्हणून शेजारी राहणार्या महिलेला संशय आला. महिला मुलीच्या खोलीत गेली असता मुलीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ मुलीच्या आईला फोन करून याबाबत सांगितले.
लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्या करणारी मी अखेरची मुलगी असेल असे मुलीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. ज्या व्यक्तीमुळे मला हे पाऊल उचलावे लागत आहे त्याचे नाव घेण्यास मला भिती वाटत आहे. मला खूप जगायचे होते आणि इतरांची मदत करायची होती. पण त्यापूर्वीच मला हे जग सोडून जावे लागत आहे असे पीडित मुलीने चिठ्ठीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या शाळेत चौकशी केली आहे. पोलीस कसून आरोपीचा शोध घेत आहेत.



























































