बिहारमध्ये मुख्यध्यापकासह १८ जणांनी केला विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक भयंकर घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. बिहारमधील छपरा जिल्ह्यात एका शाळकरी मुलीवर शाळेतील मुख्यध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेतच सामूहीक बलात्कार केला आहे. गेल्या सात महिन्यांपासून या मुलीवर १८ जणांनी बलात्कार केले आहेत. तिच्यावर बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील चित्रीत करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत वारंवार बलात्कार केल्याचं या मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. पोलिसांनी या मुलीच्या तक्रारीच्या आधारे मुख्याध्यापक, एका शिक्षकाला अटक केली आहे तर दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय.

छपरा जिल्ह्यातील परसागढ गावातील दिपेश्वर बाल ग्यान निकेतन शाळेत ही विद्यार्थिनी दहावीत शिकत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिच्या वर्गातील एका विद्यार्थ्याने तिला शाळा सुटल्यानंतर शाळेच्या टेरेसवर भेटायला बोलावले होते. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्या विद्यार्थ्याच्या मित्रांनी या बलात्काराचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो विद्यार्थी तिला व्हिडीओ व्हायरल करायची धमकी देत होता. त्यानंतर या विद्यार्थ्याच्या आणखी चौदा मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या सगळ्यामुळे हादरून गेलेल्या त्या विद्यार्थिनीने शाळेचे मुख्यध्यापक उदय कुमार उर्फ मुकुंद सिंग यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर आरोपी मुलांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनी व शाळेतील दोन शिक्षकांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुणालाही सांगितले तर तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

मुलांकडून व शिक्षकांकडून सतत होणाऱ्या बलात्कारांमुळे पीडित मुलगी पार हादरून गेली होती. त्यामुळे तिने अखेर हिंमत एकवटून एकमाथाना पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस इंदिरा राणी यांनी तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला व याप्रकरणी तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणात मुख्यध्यापक,एक शिक्षक व दोन विद्यार्थ्यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.