चमत्कार झाला… साई बाबांनी दिले भक्तांना दर्शन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिर्डी

साईबाबांचा चमत्कार पुन्हा एकदा भाविकांना पहायला मिळाला. बुधवारी रात्री १२ च्या सुमारास द्वारकामाई मंदिरात साईबाबांचा चेहरा दिसत असल्याने भाविकांनी बाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

साई बाबा शिर्डीत आल्यावर पडक्या मस्जीद मध्ये राहत होते. बाबा या मज्जीदीला द्वारकामाई म्हणत. द्वारकामाई मंदिरात साईबाबा ज्या भिंतीला पाट लावून बसत होते त्या भिंतीवर साईबाबांचा चेहरा बुधवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास पहायला मिळाला. बाबांचा हा चेहरा रात्री १२ वाजल्यापासून ३ वाजेपर्यंत दिसत होता. भाविकांनी बाबांचा चेहरा पाहिल्यानंतर काही क्षणात ही बातमी वार्‍यासारखी शहरभर पसरली. भाविकांनी आणि शिर्डी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.

साईबाबांनी आपल्या हयातीत याच द्वारकामाई मंदिरात अनेक चमत्कार केले आहे. कधी पाण्याने दिवे लावत तर कधी भाविकांना वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन देत. बाबांनी आपल्या हाताने पेटवलेली धूनी आजही या द्वारकामाई मंदिरात जळताना दिसत आहे. या धुनीतून निघणार्‍या राखीची उदी बनून साई संस्थान भाविकांना साई प्रसाद म्हणू देत आहे. साईबाबांच्या साई प्रसादलयासमोर हंडीत हात घालून उभी असलेल्या मूर्तीच्या बाबांच्या हाताच्या एका बोटातून पाणी येत होते. तर ६ जानेवारी २०१२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरात बाबा ज्या भिंतीला पाट लावून बसत त्या भिंतीवर बाबांचा चेहरा दिसत होता. तर आज पुन्हा एकदा या भिंतीवर बाबांचा चेहरा भाविकांना दिसला. त्यामुळे बाबांचा हा अनोखा चमत्कार पुन्हा एकदा भाविकांना पहायला भेटल्याने साईबाबांचे साक्षात दर्शन भेटल्याचा आनंद भाविकांच्या चेहर्‍यावर दिसत होता.

साईबाबांचे द्वारकामाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवले जाते. काल मध्यरात्री दिल्ली येथिल काही भाविक दर्शानासाठी मंदिरात आले असताना साईबाबा ज्या भिंतीला पाट लावून बसत असलेल्या भिंतीवर साईबाबांचा चेहरा दिसत असल्याचे पाहिल्यानंतर साईबाबा साक्षात दर्शन देत असल्याचे वार्ता संपूर्ण शिर्डी शहरात पसरल्याने शिर्डी ग्रामस्थांना बरोबर देशभरातून साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी रात्री साईबाबांच्या या चेहर्‍याचे दर्शन घेतले. द्वारकामाई मंदिरात बाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झालेली गर्दी सुरळीत करण्यासाठी साई संस्थानच्या सुरक्षा कर्मचार्‍यांना मोठी कसरत करावी लागली.