मन कृष्ण झाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगीतकार मिथिलेश पाटणकर… श्रीकृष्णाची बासरी त्याला अधिक जवळची वाटते.

  • आपलं आवडतं दैवत : श्रीकृष्ण. तो बासरी वाजवतो, त्यामुळे संगीताशी त्याचं नातं आहे. वाद्य वाजवणारे सगळे देव आवडतात.
  • त्यांचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं : रोजच्या जगण्यात पुराणातल्या गोष्टी आपण ऐकतो. त्यामुळे सगळ्या देवदेवतांवर श्रद्धा असतेच. तरीही शंकर, श्रीकृष्ण या देवांचे स्वभावविशेष मला खूप आवडतात. त्यांच्याकडून शिकायला मिळतं.
  • संकटात ते तुम्हाला कशी मदत करतात, असं वाटतं : संकटाची वेळ आली की, देवाची आठवण करावी असं नाही, तर कायमच त्याच्याशी अनुसंधान असावं. माणसाच्या जगण्यात जिवंतपणा असावा. एखाद्याला दाद देणं हा जिवंतपणा. मुलाखतीतून, पुस्तकं वाचण्यातून शिकायला मिळतं. रोज काहीतरी नवं शिकण्याची इच्छा महत्त्वाची असते. ही तळमळ असली तर देवाची कृपा असते.
  • कला आणि भक्तीची सांगड कशी घालता : जो माणूस रोज संगीताच्या सहवासात असतो तो आपसूकच दैवी तत्त्वाच्या जवळ असतो. त्यामुळे आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आम्हाला रोज संगीताच्या वातावरणात राहायला मिळतं.
  • तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते :   जगात भ्रष्टाचार होतो, संधीसाधू, खोटं बोलणारी, वापरून घेणारी माणसं असतात. तरीही सकारात्मकतेवर, चांगूलपणावर विश्वास हवा. आपलं काम प्रामाणिकपणे करावं. माझी अशी धारणा आहे.
  • आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग : आवडत्या कलाकारांबरोबर काम करायला मिळावं, अशी इच्छा असते. 1999साली पहिल्यांदाच हिंदी चित्रपटाचं संगीत संयोजन करत होतो. तिथे आशाबाई गायला आल्या. मला खूप आनंद झाला. तेव्हा प्रार्थना नव्हती केली, पण मनात इच्छा होती. ज्यांची गाणी ऐकली त्यांच्याबरोबर काम करताना मनाला वेगळी ऊर्जा मिळते.
  • त्यांच्यावर रागावता का : माझ्या बाबांचा देवतांवर खूप अभ्यास आहे. अहं ब्रह्मास्मी म्हणजे ब्रह्म स्वतःतच चांगल्या-वाईट गोष्टी निर्माण करतं. प्रत्येक गोष्ट ब्रह्मातूनच निर्माण झालेली आहे. यातूनच सगळं जग चाललंय त्यामुळे तोच सृष्टीचा समतोल साधतो. कोणावर अन्याय झाला, अपघात झालेला बघितलं की, आपल्याला वाईट वाटतं. तेव्हा  त्याकडे नियतीचा भाग म्हणून बघायला शिकलं पाहिजे.
  • देवबाप्पा तुमचे लाड कसे पुरवतो : लाड पुरवण्यापेक्षा अडचणीत असताना मदत मिळते, हे महत्त्वाचं.एकदा रेकॉर्डिंगसाठी सारंगीवादकाची गरज होती. एका वादकाला ऐनवेळी येणं शक्य झालं नाही. मी खूप जणांना फोन केले. त्या दिवशी सारंगी वादक मिळणं अत्यावश्यक होतं. काही वेळाने एक सारंगीवादक मला अचानक स्टुडियोच्या दारात दिसला. त्याच्यामुळे त्या दिवशीचं रेकॉर्डिंग सुरळीत पार पडलं.
  • आवडत्या दैवताचे कोणते स्वरूप आवडते : बासरी वाजवणारा श्रीकृष्ण.
  • त्याच्यापाशी काय मागता : माझ्या कलेच्या क्षेत्रात मला चांगल्या कलाकारांचा सहवास मिळू दे. अजून प्रगती करण्यासाठी रोज नवीन शिकण्याची, रियाज करण्याची तळमळ कायम राहू दे.