आमदार सतीश चव्हाण यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था

433

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहर ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. मात्र याकाळात विद्यार्थी तसेच गोरगरीब गरजू नागरिकांची उपासमार व गैरसोय होऊ नये यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने असे विद्यार्थी व नागरिकांसाठी आज शहरात विविधि भागात ‘फुड पॅकेट’ वाटप करण्यात आले आहे.

आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा अतिशय नियोजन पूर्वक पाऊले उचलून शहरातील नागरिकांचे रक्षण करीत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा एकमेव सुरक्षित उपाय असल्यानेच आपले शहर देखील ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. शहरातील नागरिक देखील याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून घरातच थांबत आहेत. अर्थात तो सध्या महत्वाचा उपाय आहे त्याविषयी दुमत नाही. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर तसेच संभाजी पेठेतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या अनेक विद्यार्थ्यांनी  मेस बंद झाल्याचे सांगुन भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती केली. संकटाच्या काळात गरजूंना आपण मदत करणे गरजेचे असून सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आपण ही मदत करण्याचा निर्णय घेतला असे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.

विद्यापीठ परिसरातील पार्वती नगर, बेगमपूरा, संभाजीपेठेतील भागातील विद्यार्थी तसेच रेल्वे स्टेशन परिसर, अयोध्या नगरी, मोंढा नाका, कोकणवाडी, हमालवाडा आदी भागात गोर गरीब गरजू नागरिकांना ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम पाळत आज जवळपास 700 फुड पॅकेट वाटप केले असल्याचे सतीश चव्हाण यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या