
सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही एकनाथ शिंदे आणि सहकारी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा सुरूच आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सुनावणी प्रक्रियेच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार अजून दोन महिने म्हणजेच 23 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर पुन्हा उलटतपासणी होणार आहे. ती किती दिवस चालणार याचा काहीही उल्लेख नाही. मिंध्यांना वाचविण्यासाठी सुरू असलेल्या या तारखांच्या खेळावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संताप व्यक्त केला आहे. प्रत्येक वेळेला सर्वोच्च न्यायालयात जावे लागणार का, आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही, असा सवाल शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीचे वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांनी आज जाहीर केले. त्यानुसार 23 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी चालणार आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभाध्यक्षांकडे दाखल सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. मात्र मिंधे गटाकडून त्यास विरोध होत आहे. यासंदर्भात 13 ऑक्टोबरला अध्यक्ष नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. सर्व याचिकांवरील सुनावणी एकत्रित घ्यायची की नाही याबाबत 20 ऑक्टोबरला निर्णय होण्याची शक्यता आहे.
सुनावणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
– 6 ऑक्टोबर 2023 ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे 23 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रावर मिंधे गटाचे वकील उत्तर दाखल करतील.
-13 ऑक्टोबर 2023 ः अपात्रतेबाबतच्या सगळय़ा याचिकांवरील सुनावणी एकत्रितरीत्या घेण्यात यावी अशा अर्जावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने युक्तिवाद होईल. तसेच कागदपत्रे रेकॉर्डवर आणण्याच्या अर्जावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होईल.
– 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर ः विधानसभा सचिवालयात दाखल असलेल्या कागदपत्रांची, आदेशांची पाहणी करण्यासाठी, कागदपत्रे शोधण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वकिलांना संधी देण्यात येईल.
– 20 ऑक्टोबर 2023 ः अपात्रतेबाबतच्या सगळय़ा पिटीशनची सुनावणी एकत्र व्हावी तसेच कागदपत्रे रेकॉर्डवर आणावी अशी मागणी करणाऱया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे दाखल अर्जावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय जाहीर करतील.
-27 ऑक्टोबर 2023 ः दाखल कागदपत्रांपैकी कोणती स्वीकारायची आणि कोणती नाकारायची यावर दोन्ही पक्ष आपापले म्हणणे सादर करतील.
– 6 नोव्हेंबर 2023 ः अपात्रतेबाबत निर्णय घेताना काय मुद्दे विचारात घेतले पाहिजेत यावर दोन्ही पक्ष आपापले म्हणणे लेखी स्वरूपात सादर करतील आणि त्याच्या प्रती एकमेकांना देतील.
– 10 नोव्हेंबर 2023 ः अपात्रतेबाबत निर्णय घेताना कोणते मुद्दे विचारात घेऊन नक्की केले पाहिजेत यावर विधानसभा अध्यक्ष दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकतील.
– 20 नोव्हेंबर 2023 ः प्राथमिक तपासणी घेण्यासाठी दोन्ही पक्ष त्यांच्या साक्षीदारांची यादी व प्रतिज्ञापत्र दाखल करतील.
– 23 नोव्हेंबर 2023 ः या तारखेपासून उलटतपासणी सुरू होईल आणि आवश्यकतेनुसार तसेच दोन्ही पक्षांच्या व वकिलांच्या सोयीनुसार तारखा देण्यात येतील. शक्य असेल त्याप्रमाणे उलटतपासणी आठवडय़ातून दोनदा घेण्यात येईल.
अंतिम युक्तिवाद
वरील सर्व प्रक्रिया संपल्यावर दोन आठवडय़ांनंतर अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरवली जाईल.
वेळापत्रकावर शिवसेना सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार
आमदार अपात्र होतील म्हणून वेळकाढूपणा केला जातोय. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हे वेळापत्रक दिले जाईल तेव्हा आम्ही आमची बाजू मांडू, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अॅड. अनिल परब यांनी सांगितले.
नार्वेकर पुन्हा म्हणाले, घाई करणार नाही
सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा तोच सूर आळवला. याचिकांवर सुनावणी घेताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारची घाईही केली जाणार नाही ज्यामुळे अन्याय होऊ शकतो. सुनावणीच्या प्रक्रियेबाबत सर्व पक्षकारांना माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही होईल. लवकरच निकाल देऊन विषय मार्गी लावू.

























































