
राज्याच्या राजकारणात सध्या अनेक बदल होत आहेत. अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह बाहेर पडत थेट सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या घटनेने दोन गट पडले. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत या फुटीबाबत खंत व्यक्त केली आहे. राजकारणात भागाकार, वजाबाकी होणार नाही याची खबरदारी पक्षाचा अध्यक्ष घेत असतो. यानुसारच सामंजस्याने घरातील फूट टाळण्याचे प्रयत्न केले. मात्र, यात आजपर्यंत आम्हाला त्यात यश आलेले नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत ते म्हणाले की, राजकारण बेरजेचे असते. भागाकार अथवा वजाबाकी होणार नाही याची दक्षता पक्षाचे अध्यक्ष या नात्याने घेत असतात. राष्ट्रवादी पक्ष एक कुटुंब आहे. यामुळे घरातील वाद सामंजस्याने मिटविण्याचे प्रयत्न केले तर त्यात वावगे काही आहे असे वाटत नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
पक्षातून काही माणसे बाहेर पडत असतील तर ते कसे टाळता येईल हे पाहणे पक्षाच्यादृष्टीने महत्वाचे आहे. माझ्यासह पवार यांचे हितचिंतक यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. शेवटी लढाई सुरू झाली आहे, ती होणारच असेही ते म्हणाले. यावर त्यांनी पक्षाची भूमिका आणि पक्षात पडलेली फूट याबाबत स्पष्टपणे आपले मत मांडले आहे.




























































