
सामना प्रतिनिधी । परभणी
तालुक्यातील 2018 च्या रब्बी ज्वारी पीकविम्याचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार डॉ.राहुल पाटील यांची परभणी जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने आभार मानून वाढदिवसानिमीत्त उद्धव ठाकरे यांचे अभिष्ठचिंतन करण्यात आले.
2018 हंगामातील ज्वारीचा पीकविमा परभणी तालुक्यातील एकंदर 56 गावातील 17 हजार शेतकर्यांनी काढला होता. त्यापैकी 14 हजार शेतकर्यांना भारती एक्सा या कंपनीने पीक विम्याची नुकसान भरपाई दिली. तांत्रिक कारणे सांगून 3 हजार 700 शेतकर्यांना सदरील पीकविम्याची नुकसान भरपाई पासून वंचित ठेवण्यात आले होते. 17 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात भारती एक्सा कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार डॉ. राहूल पाटील यांनी परभणी तालुक्यातील 2018च्या रब्बी ज्वारी च्या पीकविम्याचा प्रलंबीत प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून पीकविमा कंपनीकडे याबाबत निवेदन दिले. त्यानुसार भारती एक्सा या कंपनीने झालेली चुक मान्य करत उर्वरीत 3700 पैकी 2624 शेतकर्यांना पीकविम्याची भरपाईपोटी 1 कोटी 47 लाख 48 हजार 300 रू. शेतकर्यांच्या खात्यावर जमा करत असल्याचे पत्र आमदार डॉ.राहुल पाटील यांना पाठवले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकर्यांना सदरील पीकविम्याची भरपाई मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा व आभाराचा ठराव अनेक ग्रामपंचायतींनी घेतला. 27 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परभणी जिल्हा सरपंच संघटनेच्या पदाधिकार्यांनी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे यांचे मातोश्री मुंबई येथे भेटून त्यांचे अभिष्टचिंतन करून आभार मानले. यावेळी परभणी जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चोपडे, गोपिनाथराव तुडमे, सोपानराव आरमाळ, दामोधर सानप, उत्तमराव मुळे, रमेशराव चोपडे, शिवाजीराव गरूड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



























































