
अनिल कुचे | अमरावती
बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेला वाक्प्रचार भोवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणूक निरीक्षक अधिकार्यांनी केलेल्या पाहणीत हा सर्व प्रकार उघडकीस आल्यामुळे आमदार रवी राणा यांच्या विरोधात मतदारांना प्रलोभन दाखविण्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी भातकुली पोलिसांना दिले आहेत. ‘आयी दिवाली, भरलो किराना, चुन के लाओ रवी राणा’ अशी घोषणा करीत राणा यांनी मतदारांना किराणा मालाचे प्रलोभन दाखवले होते.
यासंदर्भात जिल्हाधिकार्यांच्या वतीने बडनेरा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिगे यांनी भातकुली ठाण्यात तशी तक्रार यापूर्वीच नोंदविली असून, तसे गुन्हेसुद्धा दाखल केले आहेत. त्यामुळे रवी राणा यांच्या विजयावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
खर्चाच्या नोंदीत 40 लाखांची तफावत
कार्यालयांतर्गत दैनंदिन छायांकित रजिस्टरमध्ये केलेल्या खर्चाची नोंद व आमदार राणा यांनी सादर केलेल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदीमध्ये 40 लाख 45 हजार 897 रुपयांची तफावत आढळून आली आहे. ही बाब निवडणूक निरीक्षक श्रीरामकृष्ण बंडी यांनी निर्दशनास आणून दिली. यावेळी राणा यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही .
अधिनियम 1951 च्या कलम 123 वर 127 नुसार फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रचारासाठी रवी राणा यांनी संदेश पाठवून 10 वर्षांपर्यंत मोफत किराणा देतानाच तसे कार्ड मतदारांना वितरित केल्याचे आढळून आले आहे.





























































