विधान भवनात रंगला आमदारांचा शपथविधी सोहळा

426

‘मी…विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलेलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की…’ अशा धीरगंभीर आवाजात काही नवनिर्वाचित आमदारांनी घेतलेली शपथ, तर काही नवनिर्वाचित आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवत, एका आमदाराने तिरग्यांची, एका आमदाराने मातृसाक्ष घेऊन तर एका आमदाराने आईवडिलांची साक्ष ठेवून घेतलेली शपथ आणि त्यापूर्वी विधान भवनाच्या  प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची घेतलेली गळाभेट, सुप्रिया सुळे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना दिलेले आलिंगन हे 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या आमदारांच्या शपथविधीचे वैशिष्टय़ ठरले.

14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित केले होते. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 आमदारांपैकी 286 नवनिर्वाचित आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. भाजपचे सुधीर मुनगंटीवार व स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार हे आमदार अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी होऊ शकला नाही. ठीक सकाळी 8 वाजता शपथविधी सुरू झाला. ज्येष्ठताक्रमानुसार विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांनी सदस्यांना शपथ दिली.

आदित्य ठाकरेंची शपथ आणि टाळ्यांचा कडकडाट

शपथविधीसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाचा पुकारा होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. शपथ घेण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याशी हस्तांदोलन केले. सदस्यत्वाची शपथ घेतल्यावर सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट केला आणि सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

संयुक्त महाराष्ट्राची घोषणा

चांदवडचे आमदार राजेश नरसिंह पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर सीमावासीयांचा आवाज विधानसभेत उठवण्यासाठी ‘बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे’ अशी घोषणा दिली.

अजितदादांची धनंजय मुंडेंच्या पाठीवर थाप

राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी शपथ घेतल्यावर ते पुढे आले आणि अजित पवार यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतले. अजितदादांनी धनंजय मुंडे यांना जवळ घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी गॅलरीत खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे, आमदार मनीषा कायंदे, आमदार विलास पोतनीस, रवींद्र फाटक यांच्यासह रोहित पवार यांचे संपूर्ण कुटुंब तसेच अनेक आमदारांचे नातेवाईक उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांपासून आईवडिलांपर्यंत साक्ष

बहुसंख्य आमदारांनी ‘ईश्वर साक्ष’ असा उल्लेख करीत सदस्यत्वाची शपथ घेतली, तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सिद्धिविनायकाचे नाव घेत शपथ घेतली. बच्चू कडू यांनी तिरंग्याला साक्षी ठेवून शपथ घेतली. अतुल बेनके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवत शपथ घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी मातृसाक्ष असा उल्लेख करीत तर सुनील शेळके यांनी आईवडिलांना साक्ष ठेवत शपथ घेतली. शिवसेनेचे दिलीप लांडे सभागृहात भगवे जॅकेट आणि भगवा फेटा परिधान करून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने निवडून आलो असा उल्लेख करीत दिलीप लांडे यांनी कुलदेवता काळूबाईच्या नावाने शपथ घेतली.

आदित्य ठाकरे-रोहित पवार मैत्रीचा अध्याय

14 व्या विधानसभेतील तरुण आमदारांकडे, खासकरून आदित्य ठाकरे व रोहित पवार यांच्या मैत्रीच्या नव्या पर्वाकडे प्रसिद्धीमाध्यमांचे लक्ष लागले होते. सभागृहात रोहित पवार यांनी सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर रोहित पवार हे आदित्य ठाकरे यांच्या आसनाकडे आले आणि दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना आनंदाने मिठी मारली. शपथविधी सोहळा पार पडल्यावर आदित्य ठाकरे व रोहित पवार विधान भवनाच्या पायर्‍यांवर आले आणि दोन बोटांनी व्हीचे चिन्ह दाखवत फोटोग्राफर्सना फोटोची संधी दिली. हा क्षण टिपण्यासाठी फोटोग्राफर्सच्या कॅमेर्‍यांच्या फ्लॅशचा बराच काळ लखलखाट सुरू होता.

आपली प्रतिक्रिया द्या