
मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) पुढील 21 वर्षांत म्हणजेच सन 2041 पर्यंत तब्बल पाच लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. प्राधिकरणाच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
मुंबई महानगर प्रदेशात आठ महानगरपालिका आणि नऊ नगरपरिषदांचा समावेश आहे. 2017 मध्ये या महानगराची लोकसंख्या 24.44 दशलक्ष इतकी होती. 2041 पर्यंत ती 32.2 दशलक्ष होण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. लोकसंख्येबरोबरच या कालावधीत रोजगारांमध्येही वाढ होईल. 2017 मध्ये मुंबई महानगरात 10.24 दशलक्ष रोजगार होते ते 2041 पर्यंत 14.91 दशलक्षांवर जातील.
मुंबई महानगरातील वाहतूक व्यवस्था आणि त्यासाठी उभाराव्या लागणाऱया सुविधा, सांडपाणी निचरा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन यासाठी 2041 पर्यंत सुमारे पाच लाख कोटी रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. वाहतूक सुविधांवर वर्षाला सुमारे 21 हजार कोटी रुपये लागतील तर अन्य सुविधांवर 25 हजार कोटी रुपये लागतील असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारकडून सुमारे 3. 79 कोटी रुपये मिळतील असा अंदाज काढला गेला आहे.




























































