
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गाजवळील जमिनीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) वक्रदृष्टी पडली आहे. या प्रकल्प मार्गावर मुंबई महानगरातील जमीन आपल्याला मिळावी यासाठी एमएमआरडीएचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अगदी विरारपर्यंतच्या जमिनीचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून दर्जा मिळावा यासाठी धडपड सुरू आहे.
507 किलोमीटर लांब पल्ल्याच्या बुलेट ट्रेनचे मुंबईतील स्थानक एमएमआरडीएच्या अखत्यारितील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बांधले जाणार आहे. याशिवाय मुंबई महानगर प्रदेशात ठाणे, विरार आणि बोईसर येथेही स्थानके बांधण्याची केंद्र सरकारची योजना आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर विरार, पालघर, डहाणू या पट्टय़ामधील जमिनीला सोन्याचा भाव येणार आहे. सध्या या जमिनीमध्ये शेती केली जात आहे. तसेच बऱयाचशा जमिनीचा विकास झालेला नाही.
विरार-डहाणू पट्टय़ातील जमिनीचा विकास करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून दर्जा देतानाच आपली हद्द पुढे पेण, पनवेलपर्यंत वाढवली गेली पाहिजे असेही मत एमएमआरडीएच्या अधिकाऱयांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. या जमिनींवर निवासी गाळे, कर्मचारी वसाहती उभारता येऊ शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. वांद्रे ते डहाणू हे अंतर बुलेट ट्रेनने अवघ्या 20 मिनिटांत गाठता येणार आहे. त्यानंतर या पट्टय़ात बांधकाम व्यवसायही जोर धरण्याची शक्यता आहे.






























































