
सामना प्रतिनिधी, उल्हासनगर
प्रिय आई-बाबा… आरोग्य, चांगले शिक्षण, मुबलक पाणी, रस्ते या सुविधा आपल्याला हव्या असतील तर महानगरपालिकेला निधीची गरज आहे. आपल्या पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्यस्रोत मालमत्ता कर हाच असून तो भरणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. शहराचा विकास होण्यासाठी मालमत्ता कर आपण भरूया, असे भावनिक आवाहन आता महापालिकेच्या शाळांमधून हजारो विद्यार्थी आपल्या आई-वडिलांना उद्या सोमवारी करणार असून आपल्या सहीचे पत्रदेखील देणार आहेत. करवसुलीचे टार्गेट पूर्ण करणार असल्याची महापालिकेने नामी शक्कल लढवली आहे.
थकबाकीदारांच्या वसुलीची बंदूक 83 नगरसेवकांच्या खांद्यावर ठेवली असतानाच पालिका प्रशासनाने आता थेट विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. मालमत्ता करवसुलीचे 425 कोटी रुपयांचे टार्गेट असून आतापर्यंत केवल 52 कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. फक्त अडीच महिने शिल्लक असून त्याकालावधीत जास्तीत जास्त वसुली करावी लागणार आहे. शहरात सर्वत्र फलक, आवाहन, जाहिराती अशा विविध माध्यमांतून पालिकेने प्रयत्न सुरू केले असतानाच आता विद्यार्थ्यांना हाताशी धरून करवसुली पूर्ण केली जाणार आहे.
मराठी, हिंदी, सिंधी भाषेतून आग्रह
महापालिकेच्या 28 शाळांसह अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी तसेच सिंधी भाषेतून विनंती आग्रहपत्र देण्यात आले आहे. या पत्रामध्ये थेट आई-वडिलांनाच आवाहन केले असून पालिकेचा कर ताबडतोब भरा, अशी विनंती विद्यार्थी आपल्या सहीने करणार असल्याची माहिती करनिर्धार व संकलन अविनाश फासे यांनी दिली.






























































