
रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त गाठून गणपती दर्शनासाठी घराबाहेर पडणाऱया भक्तांना खूशखबर आहे. रेल्वेकडून आपल्या नियमित कामासाठी रविवारी घेतला जाणारा मेगाब्लॉक 24 सप्टेंबर रोजी असणार नाही. तिन्ही मार्गांवरील लोकल गाड्या आपल्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना मोठा दिसाला मिळणार आहे.
रेल्वेकडून रुळांच्या आणि सिग्नल यंत्रणेच्या नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी आठवड्या च्या प्रत्येक रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जातो. मात्र सध्या गणेशोत्सवानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतलेला नाही.
जलद गाड्या मुंबई सेंट्रल-चर्चगेटदरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार
गणेश विसर्जनानिमित्त हजारो नागरिक बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीला येतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेकडून गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते रात्री 10.30 या वेळेत चर्चगेटच्या दिशेने जाणाऱया जलद मार्गावरील सर्व लोकल गाडय़ांना मुंबई सेंट्रल-चर्चगेटदरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.


























































