
राजस्थानमधील दुर्गम गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये उंटाच्या गाडीवर फिरती लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. जोधपूरच्या 30 गावांमध्ये याची सुरुवात करण्यात आली आहे. उंटाच्या गाडीवर पुस्तकांनी भरलेली फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेली पहिली मोबाईल लायब्ररी गावामध्ये आली आणि चिमुरडय़ांच्या चेहऱयावर हसू फुलले. कुणी पुस्तक हातात घेऊन चित्रे बघू लागले, तर कुणी गोष्ट ऐकण्यात दंग झाले.
ग्रामीण भागातील मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून रूम टू रिड संस्था आणि जिल्हा प्रशासन मिळून यांनी एकत्रित येऊन उंटाच्या गाडीवर फिरती लायब्ररी सुरू केली आहे. लायब्ररीत 1500 पुस्तके आहेत. यामध्ये कथा आणि चित्रकलेची पुस्तके अधिक आहेत. लायब्ररीत स्टोरी टेलरही असेल, जो मुलांना गोष्टी सांगेल. मुलांसोबतच पालकांनाही कमीत कमी 15 ते 20 मिनिटे अभ्यासाला बसावे लागेल.
रूम टू रिड संस्था देशभरातील 9 राज्यांमध्ये हे अभियान चालवत आहे. संस्थेच्या इंटरनॅशनल रीडिंग कॅम्पेन 2021 अंतर्गत गावागावांमध्ये फिरती लायब्ररी सुरू करण्यात आली आहे.

























































