प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बसमध्ये मोबाईल चोरी, सराईत चोरटा गजाआड; 20 महागडे फोन हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सकाळ व संध्याकाळच्या वेळेस प्रवाशांनी खच्चून भरून धावणाऱ्या बेस्ट बसमध्ये मोबाईल चोरणारा सराईत गुन्हेगार टिळक नगर पोलिसांच्या हाती लागला आहे. चोरीचे महागडे मोबाईल छेडा नगर येथे विकण्यासाठी आला असता दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच्याकडील बॅगेत जवळपास तीन लाख रुपये किंमतीचे 20 स्मार्टफोन सापडले.

बेस्ट बसमध्ये मोबाईल चोरणारा एक चोरटा चोरीचे महागडे मोबाईल विकण्यासाठी छेडा नगर येथे येणार असल्याची खबर टिळक नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल वाघमारे तसेच शिंदे, सानप, साटेलकर, रोंगटे, गायकवाड या पथकाने रविवारी त्या ठिकाणी सापळा रचला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर एक व्यक्ती त्या ठिकाणी बॅग घेऊन आला असता तो मोबाईल चोर असल्याचे खबऱयाने खुणवले. त्यानुसार दबा धरून बसलेल्या पथकाने त्या व्यक्तीवर झडप घातली. त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यात वेगवेगळ्या किमतीचे महागडे स्मार्टफोन सापडले. दोन लाख 93 हजार रुपये किमतीचे ते मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. मोहम्मद जाहीर अब्बास शेख (37) असे त्या चोराचे नाव असून वाशी पोलिसांनीदेखील त्याला अशाच गुह्यात अटक केली होती. शेख हे चोरीचे मोबाईल कोणाला विकणार होता याचा टिळक नगर पोलीस आता शोध घेत आहेत. शेख याचे आणखी कोण साथीदार आहेत तेदेखील पोलीस शोधत आहेत.