शहरात जबरी चोरीसह घरफोडी करणाऱ्या टोळीवर मोक्का; सराईत गुन्हेगारांना पोलीस आयुक्तांकडून तडाखा

पुणे शहरात जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या अजिनाथ गायकवाड टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. अजिनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 24, रा. महंमदवाडी हडपसर),नागेश मनोहर वाकडे (वय 21,रा. महंमगदवाडी हडपसर) व त्यांचे इतर दोन साथीदार अशा चौघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून, गायकवाडवर 18 तर वाकडेवर 3 गुन्हे दाखल आहेत.

संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दादा लोकांचा चाप लावण्याबरोबरच जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळ्यांचा देखील बंदोबस्त करण्यास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सुरूवात केली आहे. त्यांनी शहर पोलिस आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर मोक्काअंतर्गत केलेली ही 27 वी कारवाई असून, चालू वर्षात 22 कारवाया केल्या आहेत.

गायकवाड व त्याच्या साथीदारांनी 9 मार्चला दुचाकीवरून निघालेल्या एका व्यक्तीला कोयत्याच्या धाकाने लुटले होते. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने सराईत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी विविध ठिकाणी गुन्हे केल्याचे कबुल केले होते. तपासादरम्यान अटक केलेल आरोपी व त्यांचे इतर दोन साथीदार मिळून संघटीतपणे गुन्हे करत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांनी दाखल गुन्ह्यात मोक्क्याचा समावेश करण्यात यावा म्हणून पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे यांच्याकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार मोराळे यांनी कलमवाढ करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या