
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मोचा’ हे चक्रीवादळ पुढील दोन दिवसांत उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे देशाच्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ओडिशा तसेच पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला या वादळाचा जबर तडाखा बसण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मच्छीमारांना पुढील चार दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात दोन दिवसांपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. 8 आणि 9 मे रोजी या पट्टय़ाचे भयानक चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला प्रचंड तडाखा बसण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
18 जिल्हय़ांना हायऍलर्ट
‘मोचा’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील 18 जिल्हय़ांना अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने हायअलर्ट जारी केल्यानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तातडीने बैठक घेऊन उच्चस्तरीय आढावा घेतला. संबंधित सर्व विभागांना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेशही पटनायक यांनी दिले.
किनारपट्टीवर एनडीआरएफ तैनात
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर येणाऱया सर्व जिल्हय़ांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पश्चिम बंगालच्या संपूर्ण किनारपट्टीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन खबरदारीच्या सूचना दिल्या.

























































