
कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या जगाला एक दिलासादायक आश्वासन अमेरिकेच्या मॉडर्ना इन्क या जैव तंत्रज्ञान पंपनीने दिले आहे. तशीच आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास आम्ही लवकरात लवकर मॉडर्नाची mRNA-1273 ही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात आणायला तयार आहोत असे आश्वासक उद्गार मॉडर्नाचे सीईओ स्टेफने बान्सल यांनी जगातील कोरोनाग्रस्त देशांना दिले आहे. आमची लस सध्या चाचणीच्या अंतिम टप्प्यात असून ती कोरोना रुग्णांवर 70 टक्के प्रभावी ठरल्याचा दावा बान्सल यांनी केला आहे.
जगातील अनेक देशांनी आमच्याशी कोरोना प्रतिबंधक लसीच्या मागणीसाठी करार केला आहे. आम्हीही त्यांची निराशा करणार नाही, असे सांगून मॉडर्नाचे सीईओ बान्सल म्हणाले, आमच्या कंपनीने mRNA-1273 या कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस मोठय़ा प्रमाणात तयार ठेवले आहेत. आमच्या या लसीची आतापर्यंत 25,650 स्वयंसेवकांवर यशस्वी चाचणी झाली आहे. आता शेवटच्या तिसऱया टप्प्यात आमच्या अंतिम चाचणीसाठी 30 हजार लोकांनी नोंदणी केली आहे. हा टप्पा नक्कीच यशस्वी ठरेल आणि जगाला एक प्रभावी कोरोना प्रतिबंधक लस आम्ही देऊ असा आम्हाला दृढ विश्वास आहे.
आता अंतिम चाचणीनंतर एफडीएने लसीच्या वापराला मंजुरी दिली की आम्ही लस वितरणाचे काम जगभरात सुरू करणार आहोत. आमची ही लस 70 टक्के प्रभावी ठरली आहे. त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती आल्यास आम्ही या लसीच्या पुरवठय़ाची तयारी करीत आहोत. कोरोनाच्या हाय रिस्क रुग्णांना प्रथम आमची लस मिळावी आणि त्यांचा जीव वाचावा यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही बान्सल शेवटी म्हणाले.
42 टक्के हाय रिस्क रुग्णांवर उत्तम प्रभाव
मॉडर्ना कंपनीने आपल्या कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी अन्य आजार असणाऱया 42 टक्के हाय रिस्क रुग्णांवर केली असून अन्य सामान्य रुग्णांची संख्या 37 टक्के आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे हाय रिस्क रुग्णांवर या लसीचा उत्तम प्रभाव दिसून आला आहे. मॉडर्ना अंतिम टप्प्यांत 30 हजार स्वयंसेवकांवर आपल्या या लसीची चाचणी करणार आहे. त्या चाचणीकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीनेही आपल्या कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी 12 ते 18 वयोगटातील स्वयंसेवकांवर करण्याचे ठरवले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढय़ात हिंदुस्थान सर्व शक्तीनिशी लस तयार करणाऱया देशांना मदत करणार आहे. शिवाय या लसीचा सुरक्षित साठा करण्यासाठीही मदत करणार आहे. त्यामुळे कोरोनाचा खात्मा करण्याची वेळ आता जवळ आल्याची भावना जगातील नागरिकांत दृढ झाली आहे.




























































