आता भुयारी मार्गातही मोकळा श्वास घेता येणार, सीएसएमटीत अद्ययावत वायूविजन प्रणाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्गात शिरल्यानंतर होणारी अस्वस्थता, चिडचिडपणा आणि गरम होत असल्याच्या तक्रारी कमी होऊन प्रवासी, पर्यटक आणि पादचाऱ्यांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे. भुयारी मार्गात हवा खेळती राहण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 9 जेट आणि दोन मध्यवर्ती पंखे बसवण्याचे काम सुरू आहे. या अद्ययावत वायूविजन प्रणालीमुळे भुयारी मार्गातही पादचाऱयांचा श्वास अजिबात काडाडणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचल्यानंतर प्रवासी, पादचारी, पर्यटक यांच्यामार्फत भुयारी मार्गाचा वापर करतात. भुयारी मार्गाच्या ठिकाणी खेळती हवा राहावी, यासाठी प्रणाली अस्तित्वात आहे. मात्र, रहदारीसाठी भुयारी मार्गाचा मोठया प्रमाणात होत असल्यामुळे आधुनिक व अद्ययावत उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार अधिक क्षमतेचे वायूविजन आणि हवा खेळती राहाण्यासाठी अद्ययावत प्रणालीत बसवण्यात आली आहे.

n भुयारी मार्गाच्या ठिकाणी अद्ययावत वायूविजन प्रणालीअंतर्गत एकूण 9 जेट पंखे (फॅन्स) संपूर्ण भुयारी मार्ग परिसरात लावण्यात येत आहेत.

n या जेट पंख्यांमुळे भुयारी मार्गाच्या प्रवेशाच्या ठिकाणची हवा आतमध्ये वेगाने आणण्यासाठी मदत होईल तसेच दोन अधिक क्षमतेचे पंखे मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात येत आहेत. या दोन पंख्यांमुळे मध्यवर्ती ठिकाणी भुयारी मार्ग परिसरातील हवा बाहेर टाकण्यासाठी मदत होणार आहे.

आगीच्या घटनांमध्येही उपयोगी ठरणार   

आगीसारख्या संभाव्य घटनांचादेखील विचार ही प्रणाली स्थापित करताना करण्यात आला आहे. आग लागलीच तर या यंत्रणेतील मध्यवर्ती पंखे हे अधिक क्षमतेने आणि दुप्पट वेगाने सक्रिय होतील. परिणामी धूर वेगाने बाहेर टाकण्यासाठी या प्रणालीची मदत होईल. त्यामुळे भुयारी मार्ग परिसरात वावरताना नागरिकांना दृश्यमानतेसाठीही त्याची मदत होणार आहे.