
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्याने कर्ज न चुकवण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र पाठवल्याचा दावा केला आहे. आपण २०१६मध्येच या दोघांनाही कर्ज बुडल्याप्रकरणी पत्र पाठवलं होतं, मात्र अद्याप त्या दोघांपैकी कोणीही त्या पत्राला उत्तर दिलेलं नाही, असं विजय मल्ल्या याचं म्हणणं आहे.
विजय मल्ल्याने सहा मुद्द्यांवर विस्तृत पत्र लिहिल्याचा दावा केला आहे. या पत्रात त्याने बँक, कर्ज बुडवण्याचे आरोप, किंगफिशर एअरलाइन्स, सीबीआयचे आरोपपत्र, ईडीने जप्त केलेली संपत्ती या मुद्द्यांचा अंतर्भाव केला आहे. त्याने त्या प्रेस रिलीजच्या प्रतींचे फोटो ट्वीट केले असून त्यात हा दावा केला आहे. ”मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री दोघांनाही १५ एप्रिल २०१६मध्येच पत्र पाठवलं होतं. हे पत्र आता मी प्रसिद्ध करत आहे. मात्र, या पत्राचं मला काहीही उत्तर मिळालेलं नाही. मंत्री आणि माध्यमं माझ्यावर असे आरोप लावले आहेत की जसं मी किंगफिशर एअरलाईन्सचं ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन फरार झालो आहे. काही बँकांनी तर मला जाणीवपूर्वक कर्ज बुडवेगिरी करणारा घोषित करून टाकलं आहे.” असं मल्ल्या याचं म्हणणं आहे.
After two years of silence, I have decided to issue a comprehensive press statement … 1/5 pic.twitter.com/klbeh4rF8G
— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 26, 2018
या खेरीज मल्ल्याने सीबीआय आणि ईडी यांच्यावरही खोटं आरोपपत्र दाखल केल्याचा आरोपही केला आहे. विजय मल्ल्या हा एसबीआय, फेडरल बँक, पीएनबी, आयडीबीआय, बँक ऑफ बडोदा, इलाहाबाद बँक, अॅक्सिस बँक इत्यादी बँकांकडून तब्बल ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन परदेशी फरार झाला आहे. हिंदुस्थानमध्ये प्रत्यार्पण होऊ नये यासाठी मल्ल्या सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही समोर येत आहे.




























































