
केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करत आहे का? असा सवाल पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांना केला. त्यावर हा काय प्रश्न आहे का? असा उलट सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
तसेच ‘‘लढ लेंगे इससे भी’’ असं सूचक विधानही त्यांनी केले. राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीसाठी सुप्रिया सुळे आज नागपुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. माझ्या आयुष्यात सत्तेचा दुरुपयोग मी पहिल्यांदा बघितला. विरोधात बोलले की, पाठव ईडीची नोटीस असा प्रकार सध्या सुरू आहे, पण हरकत नाही. लढ लेंगे इससे भी, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. नारायण राणे यांच्या यात्रेबाबत विचारले असता राज्यात रोजगार, कोविड, महिलांच्या प्रश्नांसह एवढे मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे मला नारायण राणे यांच्या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा चिमटा त्यांनी काढला.






























































