मोहम्मद शमी अडचणीत, न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात कोलकातातील एका न्यायालयाने समन्स जारी केले आहेत. पत्नी हसीन हिला दिलेले चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी न्यायालयाने शमीविरोधात समन्स जारी करून हजर राहण्याचे आदेश दिले आहे. बुधवारी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात शमीचे पुनरागमन झाले होते. परंतु कोलकाता न्यायालयाने समन्स जारी करून त्याच्या आनंदावर विरजण घातले आहे.

पत्नी हसीनसोबत शमीचा बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. याच प्रकरणी शमीने हसीनला एक लाख रुपयांचा चेक दिला होता. परंतु हा चेक बँकेत जमा केल्यानंतर बाऊंस झाला. या प्रकरणी हसीनने न्यायालयाचा दरवाजा ठोठावत दाद मागितली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने शमीविरोधात समन्स जारी करून २० सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शमीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत हसीनने खळबळ उडवून दिली होती. तसेच तिने शमीवर मॅच फिक्सिंग आणि देशासोबत गद्दारी केल्याचाही आरोप लगावला होता. परंतु शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान, या वादातून बाहेर पडत शमीने नुकतेच मॉडेलिंग आणि अभिनयात पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला होता. एका लघुचित्रपटात ती भूमिका करत आहे.