यंदा पर्जन्यमान कमी राहील

  • मोहन धुंडिराज दाते

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीला चालना दिली, तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस समजला जातो. आपल्याकडे गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, दसरा, दिवाळी पाडवा हे साडेतीन मुहूर्तांचे शुभ दिवस आहेत. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा शुभारंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात करणारा म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा एक महत्त्वाचा शुभ दिवस मानला जातो. आपल्याकडे प्रत्येक संवत्सराला (वर्षाला) नाव दिलेले असते. इतर कोणत्याही कालगणनेत अशाप्रकारे वर्षाला नाव दिलेले दिसत नाही. नवीन शके 1943 या संवत्सराचे नाव प्लव संवत्सर असे आहे. आपल्याकडे साठ संवत्सरांचे (वर्षांचे) एक चक्र आहे. त्याप्रमाणे ती साठ नावे पुनः पुन्हा चक्रगतीप्रमाणे येत असतात. चैत्र महिन्यात हिंदुस्थानी नूतन वर्षाचा प्रारंभ होतो. याच्याही पाठीमागे काही गणितीय सिद्धांत आहेत. आपल्या राशीचक्राची सुरुवात मेष राशीपासून होते. चैत्र महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. म्हणून चैत्र हा वर्षातील पहिला महिना आहे. या चैत्र महिन्यात पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो. म्हणून त्या नक्षत्रावरून चैत्र हे नाव पडले आहे. तेव्हा चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. हाच वर्षारंभाचासुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसारदेखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

सध्या व्यवहारात असलेल्या इंग्रजी कालगणनेनुसार काही जण 1 जानेवारी रोजी काही नवीन संकल्प, नियम, उपक्रम करण्याचे ठरवितात. त्याचप्रमाणे विविध कारणांनी महत्त्व असलेल्या या नवीन संवत्सरामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चांगले संकल्प केल्यास ते अधिक योग्य होईल. सध्याची परिस्थिती पाहता वैयक्तिक संकल्पांबरोबरच काही सामाजिक संकल्पही आपण सर्वांनीच करणे आवश्यक झाले आहे असे वाटते.

संपूर्ण जगावर परिणाम करणारे सूर्य आणि चंद्र यांच्या गणितावर आधारित असलेली कालगणना पंचांगामुळे आपणास समजू शकते. सूर्याचा व चंद्राचा योग घडत असल्यामुळे तिथी, वार आदींवर आधारित चैत्र ते फाल्गुन या बारा महिन्यांची रचना करण्यात आलेली आहे. काही धर्मांमध्ये केवळ सूर्याचाच विचार करून वर्षमान ठरविले जाते, तर काही धर्मांमधून केवळ चंद्राचाच विचार करून वर्षमान ठरविले जाते. मात्र चैत्र ते फाल्गुन या वर्षमानासाठी सूर्य आणि चंद्र या दोघांचाही विचार केल्याने निसर्गाचा समतोल कालगणनेशी साधला जातो.

चैत्र शुद्ध प्रतिपदा सूर्योदयाला ज्या दिवशी असेल तो नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढय़ा उभ्या करून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ती ग्रहांवर आधारित कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते. म्हणून संवत्सरारंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहात असल्यास आपल्या घरी ही पूजा करून गुढी उभी करण्यास काहीच हरकत नाही. त्याकरिता असे कोणतेच बंधनही नाही. त्यामुळे गुढीपूजन, पंचांगपूजन अवश्य करावे. गुढीपूजनाकरिता कोणताही विधी नाही. गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मंगलमय वातावरण तयार व्हावे याकरिता जे काही करता येण्यासारखे असेल तर सर्व करता येते. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. म्हणून ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.

ब्रह्मध्वज नमस्तेएस्तु सर्वाभिष्ट फलप्रद

प्राप्तेएस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे
मंगल कुरु ।।

ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे.

शके 1943, प्लव संवत्सराविषयी काही

गेल्या वर्षी अधिक मास आल्याने या वर्षीचा गुढीपाडवा उशिराने म्हणजे दि. 13 एप्रिल रोजी आहे. या संवत्सराचे नाव प्लव असे आहे. गेल्या वर्षी गुरू व शुक्र यांचा साधारण चार महिने अस्तकाल असल्याने धार्मिक कृत्ये त्या काळात करता आली नाहीत, पण या वर्षी तशी परिस्थिती नसून 23 फेब्रुवारी 2022 ते 20 मार्च 2022 असा एक महिना गुरूचा अस्तकाल आहे.

  • दिनांक 26 मे रोजी चंद्रग्रहण होणार असून महाराष्ट्रातून हे ग्रहण दिसणार नाही. हिंदुस्थानच्या अतिपूर्वेकडील प्रदेशातून हे ग्रहण दिसेल.
  • 27 जुलै व 23 नोव्हेंबर असे अंगारक चतुर्थीचे दोन योग आहेत.
  • या वर्षी 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव आहे.
  • 30 सप्टेंबर, 28 ऑक्टोबर आणि 25 नोव्हेंबर असे एकूण 3 गुरूपुष्यामृत योग आहेत.
  • 4 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असून 5 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आणि 6 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे.

संवत्सर फल

पंचांगामध्ये प्रत्येक संवत्सराचे फल लिहिलेले असते. ग्रामीण भागात तसेच शेतकरी वर्ग मोठय़ाप्रमाणे या संवत्सर फलाचे वाचन करतो आणि त्यानुसार त्याच्या कामाचे नियोजन केले जाते. प्रत्येक संवत्सराचा एक राजा आणि त्याचे मंत्रिमंडळ अशी त्याची रचना असते. तसेच संपूर्ण हिंदुस्थानचा विचार करून त्यांची कार्यक्षेत्रेदेखील सांगितलेली असतात. तसेच त्या त्या ग्रहाकडे अधिपत्य असल्याने काय परिणाम मिळेल याची एकेका ओळीत माहिती दिलेली असते.

राजा मंगळ असल्याने धान्य आणि संपत्ती कमी होईल. आग, चोर आणि रोगराई यापासून त्रास होईल. पाऊस कमी पडेल. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. भांडणे वाढतील. मेघाधिप चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरिपाचा स्वामी शुक्र असल्याने पाऊस पुष्कळ पडेल आणि धनधान्याची वृद्धी होईल. राष्ट्राची संपत्ती वाढेल. रोगराई कमी होईल. रसांचा अधिपती रवी असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य होईल. ऊस, तेल, सातू कापूस कमी मिळतील. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दुधदुभते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. नीरसांचा अधिपती शुक्र असल्याने गंध, सोने, मोती व कापड यांच्या किमती वाढतील.

पर्जन्य हवामान 

एप्रिलच्या मध्यानंतर वळवाचा पाऊस होण्याची शक्यता दिसते. 19 एप्रिलनंतर उष्ण तापमानात वाढ होईल. 24 एप्रिलनंतर तापमानात चढ उतार होत राहतील. मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात पर्जन्यमान मध्यम राहील. मधली काही नक्षत्रे पर्जन्यास अनुकूल आहेत, पण एकंदरीत पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहील असे दिसते. मान्सूनचे आगमन थोडे लांबेल. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आणि नववर्षाचा आरंभ दिन म्हणून गुढीपाडव्याचे महत्त्व अबाधित राहणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा पाडव्याचा मुहूर्त आणि गुढीपाडव्यापासून सुरू होणारे नवीन संवत्सर सुखाचे जावो ही सर्वांना शुभेच्छा!

मृग नक्षत्र या नक्षत्राचा पाऊस मध्यम मानाने होईल. हवेतील उष्णतामान फारसे कमी होईल असे दिसत नाही. दि. 12 ते 18 पाऊस अपेक्षित.

आर्द्रा नक्षत्र या नक्षत्राचा पाऊस पूर्वार्धात चांगला पडेल. 1 जुलैनंतर पर्जन्यमान कमी राहील. भूकंपाची शक्यता दिसते. दि. 26 ते 30 पाऊस अपेक्षित.

पुनर्वसू नक्षत्र मध्यम वृष्टीचे योग आहेत. दि. 10 ते 15 पाऊस अपेक्षित.

पुष्य नक्षत्र या नक्षत्राच्या उत्तरार्धात पाऊस जोर धरेल. दि. 23 ते 29 पाऊस अपेक्षित.

आश्लेषा नक्षत्र या नक्षत्राचा पाऊस संमिश्र दिसत आहे. काही भागांत चांगली वृष्टी होईल. दि. 4 ते 12 पाऊस अपेक्षित.

मघा नक्षत्र या नक्षत्राचा पाऊस समाधानकारक होईल, पण काही भागांत वारा सुटून ढग निघून जाण्याच्या घटना घडतील. दि. 20 ते 26 पाऊस होईल.

पूर्वा नक्षत्र या नक्षत्राचा पाऊस मध्यम ते कमी प्रमाणात होईल आणि सर्वत्र होणार नाही. सप्टेंबर 3 ते 8 पाऊस अपेक्षित.

उत्तरा नक्षत्र या नक्षत्राचा पाऊस मध्यम प्रमाणात होईल. काही भागांत पिकांना उपयुक्त असा होईल. उष्ण तापमानात वाढ होईल. दि. 16 ते 22 पाऊस अपेक्षित.

हस्त नक्षत्र या नक्षत्राचा पाऊस उत्तरार्धात शेवटी बऱयापैकी होईल, पण खंडित वृष्टीचे योग आहेत. दि. 1 ते 6 ऑक्टोबर पाऊस अपेक्षित.

चित्रा नक्षत्र या नक्षत्रात पर्जन्यमान चांगले राहील, पण 9 ऑक्टोबरनंतर काही भागांत पाऊस ओढ धरेल. दि. 13 ते 19 पाऊस अपेक्षित.

स्वाती नक्षत्र या नक्षत्राचा पाऊस फारसा होणार नाही. दि. 28 ते 31 पाऊस अपेक्षित.

n [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या