
सामना प्रतिनिधी । नगर
लष्करी वसाहतीतील एका अधिकाऱ्याने शेजारी राहणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एका कॅप्टनविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका लष्करी अधिकाऱ्याची पत्नी सोमवारी सायंकाळी घरातील बाल्कनीमध्ये बसली होती. त्या वेळी शेजारच्या घरात राहणाऱ्या अधिकाऱ्याने घराच्या लॉनवर येऊन त्या महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केले. तसेच अश्लील शेरेबाजी देखील केली. एवढेच करून तो थांबला नाही तर या महिलेस दमदाटी केली.
शेजारी राहणाऱ्या अधिकाऱ्याने केलेला हा विचित्र प्रकार महिलेने आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर महिलेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.





























































