ट्रीपमागे दुप्पट पैसे मोजून मोनोची सेवा सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मोनो रेल येत्या 1 सप्टेंबरपासून पुन्हा ट्रॅकवर येत आहे, पण ट्रीपमागे दुप्पट पैसे देऊन. गेल्या नोव्हेंबरमध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात डब्यांना आग लागल्याच्या घटनेपासून मोनो रेलची सेवा बंद आहे. आता 10,600 रुपये ट्रीपमागे देण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मान्य केले असल्याचे समजते.

लार्सन ऍण्ड टुब्रो आणि मलेशियाची स्कोमी इंजिनीयरिंग (एलटीएसई) या कंपनीने मोनो रेल्वे चालवण्यासाठी एका ट्रीपमागे 18 हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु एमएमआरडीएने नेमलेल्या एकसदस्यीय जैन समितीने 10,600चा दर ठरवला. फेब्रुवारी 2019 पर्यंत मोनोचा वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा सुरू झाला की हा दर आणखी वाढवून देण्यात येणार आहे.

मोनो रेल्वेचे चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते जेकब सर्कल हे दोन्ही टप्पे सुरळीत होण्यास किमान दहा महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर ट्रीपचा दर त्यापुढील तीन वर्षांसाठी निश्चित केला जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाला प्रत्येक किलोमीटरला दीड रुपये मोजावे लागतील असे मोनेचे दर असावेत अशी जैन समितीची शिफारस आहे. परंतु मोनो पुन्हा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला हा दर अडीच रुपयांवर ठेवावा लागणार आहे असे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सुरक्षेचे उपाय

  • मोनो रेलच्या डब्यांना आग लागण्याची घटना दुर्दैवी होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरक्षा उपाययोजनांवर गांभीर्याने भर देण्यात आला आहे.
  • प्रत्येक डब्यामधील स्मोक डिटेक्टर्सची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.
  • प्रत्येक स्थानकातील प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या शेवटी हाय-रिझोल्युशन कॅमेरे लावले जाणार आहेत. जेणेकरून मोनो रेल स्थानकातून रवाना झाल्यानंतरही दूरपर्यंत तिच्यावर नजर ठेवता येणार आहे.