पावसाचा नूर बदलला; कधी हलका, कधी एखादी जोरदार सर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

जुलैच्या सुरुवातीला जोरदार बरसल्यानंतर आता पावसाने मुंबईकडे पाठ फिरवली आहे. आज शुक्रवारी दिवसभर अधूनमधून हलका, काही ठिकाणी नुसताच शिडकावा तर मध्येच एखादी जोरदार सर असा पावसाचा नूर होता. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मध्येच सूर्यनारायणानेही दर्शन दिले. पुढचे दोन दिवस मुंबईत असेच वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

एकाच दिवसात महिनाभराचा पाऊस झाल्याने मुंबईतल्या धरणांमध्ये दोन दिवसात 18 दिवस पुरेल इतका पाणीसाठा वाढला. पण,आता पुन्हा पावसाने पाठ फिरवलेली आहे.

पाऊस गेला कुणीकडे…

दक्षिण कोकण ते केरळपर्यंत निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता कमजोर झाला आहे. आता गुजरातच्या पुढे हा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे मुंबईतून पाऊस गायब झाला आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. या वाऱ्यांचा वेग वाढला आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर मुंबईत पुन्हा जोरदार पाऊस कोसळेल असे स्कायमेटच्या महेश पलावत यांनी सांगितले.