मान्सून शनिवारी केरळमध्ये दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

मान्सूनने मागील दोन दिवसांत आणखी काही भागांत प्रगती केली असून श्रीलंकेचा निम्मा भाग व्यापला आहे. दक्षिण हिंदुस्थानात हवेच्या मधल्या थरात वाऱ्याचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र तयार झाले असून शनिवारपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनची महाराष्ट्राकडील वाटचाल निश्चित होणार आहे.

सोमवारी अरबी समुद्रात प्रगती करीत श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत पोहोचलेल्या मान्सूनने मालदीव बेटे आणि कोमोरीन भाग तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांतही प्रगती केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत वाऱ्यांनी बुधवारी श्रीलंकेतील कोलंबोच्या उत्तरेकडील भाग व्यापला, तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही वाऱ्यांनी प्रगती केली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

विषुववृत्ताकडून येत असलेले वाऱ्यांचे प्रवाह, दक्षिण भागात समुद्रसपाटीपासून 3.1 ते 4.5 किलोमीटर उंचीवर असलेले हवेचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र यामुळे शनिवारी केरळात दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे. बंगालच्या उपसागराकरील मान्सूनची शाखा रविवारपर्यंत ईशान्य हिंदुस्थानातील काही राज्यांत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनच्या आगमनाच्या चाहुलीमुळे शहरातील वातावरणही बदलले आहे. गुरुवारी संपूर्ण दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे शहराच्या कमाल तापमानातही सुमारे चार अंशाने फरक पडला. शहरात 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.