यंदा मान्सून लांबणार, स्कायमेटने वर्तवला हवामानाचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या कृषीप्रधान संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून यंदा लांबणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत स्कायमेट वेदर या खासगी संस्थेने माहिती दिली आहे. यंदा मान्सून अंदमानातच उशिराने दाखल होईल, असा स्कायमेटचा अंदाज आहे.

सर्वसाधारणपणे, अंदमानात मान्सून 22 मे रोजी दाखल होतो. त्यानंतर केरळमध्ये मान्सून 1 जूनच्या आसपास दाखल होतो आणि मग त्याच्या आठवड्याभरात तो महाराष्ट्रात येतो. पण, यंदा मान्सून अंदमानमध्येच विलंबाने दाखल होत आहे. अंदमानमध्येत मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसत असल्याने अंदमानातच त्याला येण्यास विलंब होऊ शकतो, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

त्याखेरीज मान्सून सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचं भाकितही स्कायमेटने वर्तवलं आहे. उत्तरेकडे जूनपर्यंत उष्ण हवामान कायम राहणार असून पेरण्याही त्यामुळे लांबणीवर पडू शकतात, असंही स्कायमेटने म्हटलं आहे.