राज्याला साडेचार लाख रेमडेसिवीर मिळणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राला 30 एप्रिलपर्यंत रेमेडिसीवरच्या 4 लाख 35 हजार व्हायल्स देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार व्हायल्स एवढा होता. त्यात वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

राज्यात रेमडिसीवीरच्या तुटवडय़ामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील पत्राद्वारे विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीची दखल घेऊन केंद्र सरकारने रेमडिसीवीरचा महाराष्ट्राचा पुरवठा वाढवला आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रीनवा यांनी राज्य प्रशासनाला यासंदर्भात पत्र पाठविले आहे. 21 ते 31 एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे 16 लाख रेमडिसीवीर व्हायल्स केंद्र सरकार पुरविणार असून 7 परवानाधारक उत्पादक कंपन्यांना हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.

गुजरातला 1,65,000, उत्तर प्रदेश 1,61,000, दिल्ली 72,000, कर्नाटक 1,22,000, बिहार 40,000, आंध्र प्रदेश 60,000, राजस्थान 67,000, तमीळनाडू 59,000 आणि मध्य प्रदेश 95,000 अशा प्रकारे वाटप झाले आहे.