ओव्हरटेकिंग, लेन कटिंग, धूमस्टाइल ठरतेय जीवघेणी, 2 हजार 403 जणांनी प्राण गमावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश सौंदाळकर । मुंबई

वाहनचालकांसाठी दुपारनंतरची वेळ धोक्याची ठरत असून गेल्या वर्षभरात राज्यात सायंकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान रस्ते अपघाताचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. हे अपघात एवढे भीषण होते की त्यात तब्बल 2403 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

राज्यात 3 कोटी 29 लाख वाहने आहेत. दररोज महामार्गावरून 15 लाख वाहने ये-जा करत असतात. महामार्गाची भौगोलिक आणि रस्त्याची रचना ही अपघातांना कारणीभूत ठरत आहे. त्यातच ओव्हरटेकिंग, लेन कटिंग, धूमस्टाइल वाहन चालवल्यामुळे अपघात होतात. कित्येक ठिकाणी असलेले एकदिशा मार्ग हे राज्य महामार्गाला जोडतात. या मार्गावर अनेक समस्या आहेत. मोडकळीस आलेले दुभाजक, वळणावरील अंधार ही अपघाताची प्रमुख कारणे असल्याचे महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले.

accident-statistics

पर्यायी चालकांमुळे अपघात

दिवसभर वाहन चालविल्यानंतर नियमित चालक रात्रीच्या वेळी पर्यायी चालकाकडे वाहन चालविण्यास देतो. या चालकांना रात्री वाहन चालविण्याचा फारसा अनुभव नसल्याने त्यांच्याकडून अपघात होतात.

  • 2018 मध्ये राज्यात एकूण 35 हजार 717 अपघात झाले.
  • सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत सर्वाधिक 6 हजार 112 अपघात झाले असून त्यात 2 हजार 403 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • वाहनांचा विचार केल्यास मोटरसायकलच्या 13 हजार 732 अपघातांपैकी 4 हजार 781 हे गंभीर स्वरूपाचे आहेत.- मध्यरात्री 12 ते सकाळी 6 या वेळात झालेल्या अपघातात 2 हजार 99 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • कार/जीप/ टॅक्सीचे 7 हजार 591 अपघात, बसचे 1 हजार 689 तर ट्रक-लॉरीचे 3 हजार 925 अपघात झाल्याची नोंद आहे.
  • सायकलच्या 413 अपघातांची नोंद असून त्यात 120 गंभीर अपघात होते.
  • ई-रिक्षाच्या दोन अपघातांची नोंद असून त्यात एक जण किरकोळ जखमी झाला होता.