
सामना प्रतिनिधी । मालवण
हिंदुस्थानी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांनी २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवणच्या दांडी- वायरी किनाऱ्यावरील पाषाण ‘मोरायचा धोंडा’ याठिकाणी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली. या पायाभरणीचा ३५४ वा वर्धापन दिन रविवारी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीत व शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
जेष्ठ शिवसैनिक तथा शिवप्रेमी भाई गोवेकर यांच्या हस्ते मोरयाच्या धोंड्याचे पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सौ. स्मृती कांदळगावकर, किल्ले प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, ज्योती तोरसकर, दत्तात्रय नेरकर, नगरसेवक गणेश कुशे, नगरसेविका सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, सौ. परब, प्रदीप वेंगुर्लेकर, संजय गावडे, वायरी भूतनाथ सरपंच घन:श्याम ढोके, अरविंद जाधव, आर. एन. काटकर, हेमंत वालकर, आदी व इतर शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला उभारण्यासाठी दांडी- वायरी किनाऱ्यावरील खडकावर श्री गणेश, चंद्र, सूर्य यांच्या प्रतिमा कोरून त्या पाषाणाची पूजा करून किल्ल्याच्या बांधकामाचे २५ नोव्हेंबर १६६४ रोजी भूमिपूजन केले होते. मात्र मोरयाचा धोंडा हे ऐतिहासिक ठिकाण काहीसे दुर्लक्षित राहिल्याने दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी येथे शासनामार्फत पूजा केली जावी आणि हा दिवस मोरया दिन म्हणू साजरा करावा, अशी विनंती किल्ले प्रेरणोत्सव समितीने तत्कालीन कोकण आयुक्तांकडे केल्यावर त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात आली. शासकीय पूजाही करण्याचे निश्चित करण्यात आले. गतवर्षी शासकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी येथील ४० गुंठे जागेचा स्वतंत्र सात बारा करण्यात आला. त्यामुळे या जागेच्या विकासास चालना मिळाली आहे.
दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी भूमीपूजनाचा वर्धापन दिन किल्ले प्रेरणोत्सव समिती तर्फे येथील मोरेश्वराची विधिवत पूजा करून साजरा केला जातो. यावर्षीही रविवारी सकाळी साडे आठ वाजता मोरयाच्या धोंड्याची भाई गोवेकर यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी पुरोहित अशोक खाडीलकर यांनी पौराहित्य केले. यावेळी आरती करून किल्ले सिंधुदुर्ग व मोरयाचा धोंडा या ठिकाणच्या संवर्धन कार्यास बळकटी मिळून पर्यटन विकासास चालना मिळावी असे मोरेश्वराला साकडे घालण्यात आले. जय भवानी, जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शासकीय पूजेस शासन प्रतिनिधीच नाही
मोरायचा धोंडा पूजन हा शासकीय कार्यक्रम म्हणून जाहीर करण्यात आला असताना रविवारी या पूजेस एकही शासकीय प्रतिनिधी उपस्थित नसल्याचे दिसून आले. शासनाच्या आदेशालाच शासकीय प्रतिनिधींनी केराची टोपली दाखवल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
































































