
सामना ऑनलाईन, नाशिक
तिसरीही मुलगीच झाल्याने आईनेच दहा दिवसांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी या निर्दयी आईला अटक केली आहे.
आडगाव परिसरातील वृंदावननगर भागातील गौरीगणेश अपार्टमेंटमध्ये अनुजा व बाबासाहेब काळे हे दांपत्य दोन मुलींसह राहतात. दहा दिवसांपूर्वीच त्यांना तिसरी मुलगीच झाली होती. अनुजा यांचे पती बाळासाहेब काळे हे शुक्रवारी, 31 मे रोजी कोपरगावजवळील शिंगवे येथे नातलगाच्या विवाहासाठी गेले होते. दहा दिवसांची पियू बेशुद्ध असून, आई रडतेय, अशी माहिती बाबासाहेब काळे यांना त्यांच्या मोठय़ा मुलीने मोबाईलवरून 31 मे रोजी सायंकाळी पाचला दिली. मुलीला उपचारासाठी डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचे त्यांनी पत्नीला सांगितले.यानुसार या हॉस्पिटलमध्ये या मुलीला नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित करण्यात आले. हे समजताच बाबासाहेब काळे हे रात्री हॉस्पिटलमध्ये आले. मुलीच्या डोक्याला मार लागलेला होता, गळ्याला क्रण होते, अशी माहिती डॉक्टरांनी देताच पित्याला संशय आला आणि त्याने या दहा दिवसांच्या मुलीचे शवविच्छेदन करण्याचा आग्रह धरला. गळा आवळून व डोक्यात मारहाण करून या चिमुकलीची हत्या झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणी तीन दिवस मुलीची आई अनुजा (26) हिची कसून चौकशी केली. तिसऱ्यांदाही मुलगीच झाली म्हणून आपण हत्या केल्याची कबुली या आईने दिली. तिला आज सोमवारी अटक करण्यात आली आहे.
यापूर्वीही एका मुलीचा मृत्यू
काही वर्षांपूर्वी या दांपत्याच्या बारा दिवसांच्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी या महिलेची प्रसूती नातलगाकडे कोपरगाव येथे झाली होती.त्या मृत्यूचे कारण समजलेले नाही, अशी माहिती आडगाव पोलिसांनी दिली.






























































