
लोकलचे सारथ्य करणार्या मोटरमनच्या हॉर्न वाजविण्याच्या प्रकाराचे विविध सांकेतिक अर्थ असतात. त्याला आता मुंबईकरही सरावले आहेत. परंतु मंगळवारी रात्री बाराच्या ठोक्यानंतर सीएसएमटीत जे काही झाले त्यामुळे प्रवासी आधी एकमेकांकडे पाहू लागले व नंतर नाचू लागले! हो, मोटरमननी नववर्षाचे सलग हॉर्न वाजवून असे जंगी स्वागत केले.
दररोज हजारो प्रवाशांना आपल्या मुक्कामी सुखरूप पोहचविणार्या मुंबईची लाइफलाइन लोकल ट्रेनच्या मोटरमननी मंगळवारी मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला अनोख्या पद्धतीने नवे वर्ष साजरे केले. घड्याळाच्या काट्यावर धावणारा मुंबईकर मध्यरात्री बाराच्या ठोक्याला एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या तयारीत असताना सीएसएमटी स्थानकात उभ्या असलेल्या सर्व लोकलचे हॉर्न मोटरमननी एकाच वेळी साधारणपणे मिनिटभर तरी वाजविले आणि उपस्थित प्रवाशांच्या आनंदाला पारावार उरला नाही.





























































