
मुंबईतील अनुदानित 104 शाळांमधील शिक्षकांनी सोमवारपासून आझाद मैदानात पुन्हा साखळी उपोषण सुरू केले आहे. मुंबईतील विविध शाळांमधील शिक्षक या आंदोलनात टप्प्याटप्प्याने उपोषणाला बसणार आहेत. शिक्षक भारतीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. दिवाळीत शिक्षक भारतीच्या प्रत्येक शिक्षकाने शिक्षण विभागाच्या निषेधार्थ काळी दिवाळी साजरी केली आणि सरकारचा निषेध व्यक्त केला. मात्र त्यानंतरही सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे सोमवारपासून आंदोलन पुन्हा सुरू करावे लागले असल्याची माहिती शिक्षक भारतीच्या उपाध्यक्ष नंदा कांबळे यांनी दिली. आम्ही नुकत्याच झालेल्या सहामाही परीक्षा आणि त्याचे पेपर आझाद मैदानात बसून तपासणार असेही नंदा कांबळे यांनी सांगितले.
























































