प्रेयसीच्या वडलांची अट मानली, प्रेमवीरानं स्वत:वर गोळी झाडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

आपल्या खऱ्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी एका तरुणानं मंगळवारी स्वत:वर गोळी झाडल्याची भयंकर घटना समोर आली आहे. भोपाळमधील या घटनेती तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रेयसीच्या वडिलांनी या तरुणाला त्यांच्या मुलीवरील खऱ्या प्रेमाची साक्ष देण्याकरता स्वत:वर गोळी झाडण्यास सांगितलं होतं. या घटनेत तरुणाची स्थिती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

मध्यप्रदेशात भोपाळमध्ये राहणारा अतुल (वय ३०वर्षे) याचं शिवाजी नगरात राहणाऱ्या एका तरुणीवर त्याचे प्रेम होतं. मंगळवारी सकाळी ९.३०च्या सुमारास अतुल प्रेयसीच्या घरी गेला होता. यावेळेस प्रेयसीच्या वडिलांनी अतुलला त्यांच्या मुलीवरील खरं प्रेम आहे की नाही दाखवण्याकरता एक अट घातली होती. या अटीनुसार खऱ्या प्रेमाची साक्ष देण्याकरता स्वत:वर गोळी झाडण्यास सांगितलं होतं. अतुलनं ही अट मान्य करून आपल्या फेसबुकच्या अकाऊंटवर प्रेयसीच्या वडिलांनी दिलेल्या अटीचं स्पष्टीकरण ही दिलं होतं. तसेच अतुलनं या अटीची पूर्तता केल्यास त्याचं लग्न या जन्मी प्रेयसीसोबत करून देऊ व नाही वाचला तर पुढच्या जन्मात करून देऊ असं ही प्रेयसीच्या वडिलांनी सांगितल्याचं म्हटलं होतं. प्रेमात आंधळ्या झालेल्या अतुलनं कोणत्याही गोष्टीचा विचार न करता स्वत:वर गोळी झाडून घेतली.

प्रेयसीच्या घरामधून गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आल्यानं घराबाहेर वाट पाहात असलेल्या अतुलच्या काकांनी घरामध्ये धाव घेतली. तिथं गेल्यावर काकांनी अतुलनं स्वत:वर गोळी झाडल्याचं पाहिल्यावर त्याला शिवाजीनगरातल्या एका रुग्णालयात उपचाराकरता दाखलं केलं आहे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अतुलच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असल्यानं त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.