स्वाभिमानने अभिमान गिळून टाकला, विनायक राऊत यांची खरमरीत टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

ज्या शिवसेनेशी प्रतारणा केली त्यानंतर कॉंग्रेसचे पाय धरले. मग सोनिया गांधी आणि राहुल गांधीचा उध्दार करत कॉंग्रेस सोडली. त्यानंतर स्वाभिमान पक्ष स्थापन केला पुढे स्वत:चा अभिमान गिळून टाकत स्वाभिमानच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भाजपमध्ये गेले तिथेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करायला सुरुवात केली आता लोकसभेसाठी चौथी आघाडी शोधत नारायण राणे फिरत आहेत अशी खरमरीत टीका शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात केली.

‘स्वाभिमानवाले म्हणतात खासदारांनी केलेली पाच कामे दाखवावीत. अरे पाच काय एकशे पाच कामे दाखवतो. मुख्यमंत्री पद उपभोगलेल्या नारायण राणेंना तीस वर्ष जो सोनवणे-घोडगे घाटरस्ता जमला नाही तो रस्ता आम्ही करतोय, 2008 पासून धूळखात पडलेला आनंदवाडी प्रकल्प आम्ही सुरू केलाय. मी केंद्र-राज्य सरकारमधील मंत्री अधिकाऱ्यांना 168 वेळा आनंदवाडी प्रकल्पासाठी भेटलो. मिऱ्या बंधाऱ्यासाठी पहिल्या टप्प्यात सवा दोन कोटी रुपये आम्ही खर्च करत आहोत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वीस कोटी रुपये निधी मिळावा अशी मागणी आम्ही केली आहे. स्वःता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मिऱ्या बंधारासाठी पुढाकार घेतला आहे. चिपी विमानतळ, रत्नागिरी विमानतळ, मुंबई-गोवा महामार्गाचे काम आज आम्ही पूर्ण करत आहोत असे राऊत यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

पुढे विनायक राऊत यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडला ते म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गावागावात रस्ते तयार होत आहेत. विकासापासून वंचित असलेल्या माचाळ गावात रस्त्याचे स्वप्न शिवसेनाच पूर्ण करत आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी माचाळ गावातील विद्युत यंत्रणेसाठी दहा लाखाचा निधी दिला आहे. कोकण रेल्वेच्या दुपद्रीकरण आणि विद्युतकरणाचे काम हाती घेतले आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात विकासकामे होत आहेत.

शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत म्हणाले की माझ्या विधानसभा मतदारसंघात दिड लाख मतदान झाले तर त्यापैकी एक लाख तीस हजार हे शिवसेना-भाजप युतीचे असेल आणि उरलेले वीस हजार इतरांचे मतदान असेल आमच्यात मताधिक्याची स्पर्धा आहे असे सामंत यांनी सांगितले. यावेळी संपर्कप्रमुख सुधीर मोरे, उद्योजक रवींद्र सामंत, उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, जिल्हा महिला आघाडीप्रमुख वेदा फडके, उपजिल्हाप्रमुख ममता जोशी, तालुकाप्रमुख कांचन नागवेकर, नगराध्यक्ष राहूल पंडीत, नगरसेवक रोशन फाळके, जिल्हा परिषद सदस्य परशुराम कदम उपस्थित होते.