
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, स्थगित करण्यात आलेली एमपीएससीची परीक्षा, त्याचे निकाल आणि नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. त्यामुळे आवश्यक ती दक्षता घेऊन परीक्षा तत्काळ घेण्यात याव्यात आणि नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला केली आहे.
पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱया स्वप्नील लोणकर (24) या तरुणाने आत्महत्या केली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनामुळे या परीक्षा, त्यांचे निकाल आणि नियुक्त्या स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन परीक्षा, निकाल आणि नियुक्त्यांबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत रोहित पवार यांनी आज ट्विट करत एमपीएससी परीक्षा, निकाल, नियुक्त्यांबद्दल लवकर निर्णय घेण्याची मागणी केली.
भाजपने सत्ता मिळवण्यासाठी ईडीला हत्यार बनवले
राज्यातील सर्व साखर कारखान्यांची चौकशी करा, आमची तयारी आहे, परंतु ती पारदर्शक पद्धतीने व्हावी. कुठलाही आकस ठेवून ईडीसारख्या यंत्रणेचा वापर करणे हे अतिशय दुर्दैवी आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजपने ईडीचे हत्यार बनवले आहे आणि हे कृत्य घटनाबाह्य आहे. त्यामुळे चुकीचा पायंडा आणि प्रथा भविष्यात पडतील, अशी भीती रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यात बोलताना व्यक्त केली. दरम्यान, सर्वेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरक्षणाचा प्रश्न हा पूर्णपणे केंद्र सरकारच्या हाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या चौकशीबरोबरच आरक्षणाच्या प्रश्नावरही भाजपने तत्परता दाखवावी, असा टोलाही पवार यांनी हाणला.



























































