चार वर्षात वितरण आणि पारेषणचे जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जि.बुलढाणा

राज्यातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करून ग्राहकांना अखंडित वीज पुरविण्यासाठी महावितरण आणि महापारेषणचे जाळे सक्षम करण्यात आले आहे. तसेच गेल्या चार वर्षात सुमारे ३३०० मेगावॅट निर्मिती क्षमतेची वाढ करण्यात आली असून ऊर्जा निर्मिती, पारेषण आणि वितरण कंपन्यांनी चार वर्षात चांगली कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन महराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केले. मलकापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अकोला परिमंडळचे प्रभारी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, ऊर्जामंत्री यांचे माध्यम सल्लागार विवेक जोशी आणि प्रभारी अधीक्षक अभियंता बद्रीनाथ जायभाये यांची प्रमुख उपस्थिती होती. महावितरणच्या ग्राहकात गेल्या ४ वर्षात ३५ लाखाने वाढ झाली असल्याने विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळेच सन २०१४ मध्ये १५ हजार मेगावॅट असलेली विजेची मागणी ही आता २५ हजार मेगावॅट पर्यंत वाढली आहे. २२ ऑक्टोंबर रोजी २५ हजार मेगावॅट वाढलेली विजेची मागणी महावितरणने कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण केल्याचे विश्वास पाठक यांनी सांगितले. तसेच गावागावात वीज पोचवण्यासाठी सौभाग्य योजनेअंतर्गत वीज पोहोचवली जात आहे. नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही गावे वगळता सर्व गावात वीज पोहोचली आहे. पाठक पुढे म्हणाले, राज्यात विजेची मागणी वाढत आहे. त्यानुसार सर्वत्र वीज पोहोचविण्यासाठी महानिर्मिती, महापारेषण व महावितरणच्या माध्यमातून काम सुरु आहे. राज्यात गेल्या चार वर्षात ८१ अति उच्च दाब उपकेंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच सुमारे ६६७५ सर्किट किलोमीटरच्या पारेषण वाहिन्या कार्यान्वित करून पारेषण सक्षम करण्यात आले आहे. अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रांची क्षमता ८५३५ एम. व्ही.ए.ने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे योग्य दाबाने व अखंडित वीज पुरवठा करणे शक्य होत आहे.

विदर्भ-मराठवाड्यातील कृषिपंपांच्या प्रलंबित वीज जोडण्या देण्यासाठी गेल्या चार वर्षात प्राधान्य देण्यात आले. या अंतर्गत राज्यात सुमारे साडेचार लाख कृषिपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक जोडण्या विदर्भ आणि मराठवाड्यातील कृषिपंपांना देण्यात आल्याचे पाठक यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, वीज गळती थांबविणे व कृषिपंपाला योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी यापुढे उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) कृषिपंपांना वीज जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत मार्च २०१८ अखेरपर्यंत सुमारे अडीच लाख वीज जोडण्या देण्याचे नियोजित आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी, अटल सौर कृषिपंप योजना आदी योजनांमधून शेतकर्‍यांना दिवसा १२ तास अखंडित वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न सुद्धा शासनामार्फत केला जात असल्याचे पाठक यांनी यावेळी सांगितले.

मोबाईल अ‍ॅप, भारनियमन, गो ग्रीन योजना, ग्राम विद्युत व्यवस्थापक, HVDS, MOD, वीजदर, लाईन लॉस कमी करणे, या विषयावर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. राज्यातील सर्व पाणी पुरवठा योजना व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय रुफ टॉप सोलरच्या माध्यमातून घरोघरी सौर ऊर्जा निर्मिती केली जात आहे, याकडेही पाठक यांनी लक्ष वेधले. पाठक यांच्या महाराष्ट्र दौर्‍यातील ही ३१ वी पत्रपरिषद आहे. ऊर्जा विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या ४ वर्षात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामांचा, राबविलेल्या योजनांचा आलेख जनतेसमोर सादर करण्यासाठी पाठक यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. यापूर्वी ऊर्जा विभागातर्फे असा उपक्रम राबविलेला नाही हे येथे उल्लेखनीय. या निमित्ताने ऊर्जा विभाग राज्यातील लोकांसमोर पोहोचला आहे.