एमएसआरडीसी व्यवस्थापकीय संचालकाच्या पुत्राने प्रेयसीला कारखाली चिरडले, ठाणे हादरले

वसंत चव्हाण

प्रेयसीसोबत झालेल्या वादातून अश्वजीत गायकवाड या तरुणाने अंगावर कार घालून चिरडत तिला गंभीर जखमी केल्याची घटना घोडबंदर रोडवरील ओवळा भागात घडली. प्रिया सिंग असे तिचे नाव आहे. अश्वजीतने मित्रांच्या मदतीने हा हल्ला केल्याचा आरोप प्रियाने केला असून तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अश्वजीतसह तीन जणांवर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अश्वजीत हा एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by PRIYA SINGH (@priyasingh_official)

प्रिया सिंग ही उच्चशिक्षित तरुणी घोडबंदर येथे राहते. अश्वजीत गायकवाड याने तिला सोमवारी पहाटे 4.30च्या सुमारास ओवळा येथील कोर्टयार्ड हॉटेलजवळ भेटायला बोलावले. तेथे त्यांच्यात वाद झाले. अश्वजितने प्रियाला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच तिच्या डाव्या हाताला चावाही घेतला. त्यानंतर अश्वजीतने त्याच्या मित्रांना तिला कारने उडवून टाका असे सांगताच त्याचे मित्र रोमील पाटील आणि सागर शेळके यांना प्रियाच्या अंगावर कार घालून तिला चिरडले. या घटनेत प्रिया गंभीर जखमी झाली. तिने इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावरून प्रियकर अश्वजीत गायकवाडने जीवघेणा हल्ला केल्याची पोस्ट आज व्हायरल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

तीन दिवसांनंतरही आरोपी मोकाट; पोलिसांवर कोणाचा दबाव?

कासारवडवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतरही आरोपी अश्वजीत गायकवाड, रोमील पाटील आणि सागर शेळके हे मोकाट फिरत आहेत. त्यांना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही. अश्वजीत गायकवाडची ठाण्यातील अनेक प्रमुख नेत्यांशी राजकीय जवळीक असल्याने आणि तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या एमएसआरडीसी खात्याचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र असल्याने ठाणे पोलीस दबावाखाली कारवाई करत नाहीत काय, असा सवाल उपस्थित होत आहे.